देसाईगंज : अल्पसंख्याकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ कार्यरत आहे. याअंतर्गत मुस्लिम, शिख, जैन, पारसी, ख्रिश्चन या अल्पसंख्याक गटात मोडणाऱ्या धर्मातील लोकांना विविध योजनांचा लाभ मिळतो, मात्र सध्या महामंडळाचे कामकाज चंद्रपूर येथील कार्यालयातून चालविण्यात येत असल्याने गडचिरोली व गोंदिया येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. आता हा त्रास थांबणार असू दोन्ही जिल्ह्यात हे कार्यालय सुरू करण्यासाठी जागेचा शोध घेण्याची सूचना ना.धर्मरावबाबा आत्राम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.
दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांना महामंडळामार्फत विविध योजनांचा लाभ त्याच जिल्ह्यात मिळावा; यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव युनूस शेख यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार धर्मरावबाबा यांनी जनतेची कळकळ लक्षात घेता; मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र पाठवून यासंदर्भात अवगत केले. लगेच व्यवस्थापकीय संचालकांनी आदेश काढून गडचिरोली व गोंदिया जिल्ह्याकरीता मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाकरीता मंजुरी दिली आहे.
ना.आत्राम यांनी गडचिरोली व गोंदिया जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना कार्यालय सुरु करण्यासाठी अखत्यारितील जागेपैकी 400 ते 500 चौ.फुट क्षेत्रफळाची कार्यालयीन जागा उपलब्ध करुन देण्याची सूचना पत्राद्वारे केली आहे. हे जिल्हा कार्यालय झाल्यानंतर जनतेला होणारा त्रास संपुष्टात येणार आहे. ना.धर्मरावबाबा आत्राम यांच्याशी चर्चा करताना महासचिव युनूस शेख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, प्रदेश उपाध्यक्ष नाना नाकाडे हेसुद्धा उपस्थित होते.