गडचिरोली : जिल्ह्याच्या अतिदुर्गम, आदिवासीबहुल भागात योग्य पद्धतीने आरोग्य सेवा पोहोचवणे हे आरोग्य विभागासाठी नेहमीच आव्हानात्मक असते. त्यातही विपरीत भौगोलिक परिस्थितीमुळे आणि पावसाळ्यात वाढत असलेल्या डासजन्य आजारांच्या स्थितीत परिस्थिती आणखीच बिकट होते. पण भामरागड तालुक्याच्या लाहेरी या हिवतापप्रवण क्षेत्रासाठी कार्यरत डॅा.संभाजी भोकरे यांची सेवा सर्वांसाठी कौतुकाचा विषय झाली आहे. स्वत: मलेरियाग्रस्त असताना हे डॅाक्टर स्वत:ला सलाईन लावलेल्या अवस्थेत रुग्णांची तपासणी करतानाचे दृष्य त्यांच्यातील सेवाभावाचा परिचय देत आहे.
जंगलव्याप्त गडचिरोली जिल्ह्यात राज्यात दरवर्षी मलेरियाचे रुग्ण सर्वाधिक असतात. त्यामुळे आरोग्य विभागाकडून मच्छरदाण्यांच्या वाटपापासून डासनाशकांच्या फवारणीपर्यंत विविध उपाययोजना केल्या जातात. पण तरीही पावसाळ्याला सुरूवात झाली की डासांची उत्पत्ती वाढून मलेरियासारखे आजार बळावतात. सध्या भामरागड तालुक्यातील दुर्गम आणि जंगलव्याप्त असलेले लाहेरीचे प्राथमिक आरोग्य केंद्र हे हिवतापप्रवण क्षेत्रासाठी संजीवनी ठरले आहे. या केंद्रात कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी डॉ.संभाजी देवराव भोकरे हे रुग्णांसाठी देवदूत बनले आहेत. त्यांना स्वतःला हिवताप झाला आहे. असे असताना ते स्वत: उपचार घेत रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून तत्परतेने रुग्णांवर उपचार करत आहेत.
भामरागड तालुक्यात हिवतापाच्या रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी व रुग्णांवर त्वरित उपचार करण्यासाठी डॉ.संभाजी भोकरे यांची सेवा आरोग्य विभागासाठी मोलाची ठरत आहे. जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी त्यांच्या या सेवाभावी वृत्ती आणि कर्तव्यतत्परतेचे कौतुक करून त्यांना अशीच कर्तव्यतत्परता ठेवण्यासाठी शुभेच्छा दिल्या. सर्व विभागांनी समन्वयाने गडचिरोली जिल्ह्यात हिवताप निर्मूलन करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.