धानोरा : माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांनी गडचिरोली ते धानोरामार्गे छत्तीसगड जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 930 वर सुरू असलेल्या मार्ग पुनर्बांधणीच्या कामाची पाहणी करून या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. या महामार्गाच्या कामातील संथगतीबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून तपशील जाणून घेतला.
धानोरा, मुरुमगाव, गडचिरोली, राजनांदगाव ते रायपूर या भागांना जोडणारा हा मुख्य मार्ग असून दररोज मोठ्या संख्येने मोटारगाड्या, मोटारसायकली, टॅक्सी, ट्रक व इतर वाहने या मार्गावरून प्रवास करतात. सध्या सुरू असलेल्या कामामुळे रस्त्याची अवस्था बिकट झाली असून वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. धूळ, खड्डे, तीव्र वळणे आणि अपूर्ण कामे यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर डॉ.नेते यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता केळकर तसेच संबंधित कंत्राटदारांशी थेट संवाद साधत कामाची सद्यस्थिती जाणून घेतली. निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली असतानाही कामाची गती मंद का आहे, याबाबत त्यांनी विचारणा केली. “नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड न करता कामाला तातडीने गती द्यावी. रस्त्याचे काम दर्जेदार व वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी आवश्यक ती सर्व यंत्रणा तत्काळ कार्यरत करावी,” अशा सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी वन्यजीवसंबंधी (वाइल्ड लाईफ) अडचणींमुळे कामात अडथळे येत असल्याचे कारण पुढे करण्यात आले. मात्र, या अडचणींची योग्य दखल घेत प्रशासनाने आवश्यक परवानग्या व समन्वय साधून कामात कोणतीही कसर ठेवू नये, असेही डॉ.नेते यांनी बजावले. हा महामार्ग गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी जीवनवाहिनी ठरणार आहे. त्यामुळे कामाची गुणवत्ता राखत जलदगतीने पूर्णत्वास नेणे अत्यावश्यक आहे, असे डॅा.नेते म्हणाले.
यावेळी पाहणीदरम्यान भाजपचे तालुकाध्यक्ष साजन गुंडावार, जिल्हा सचिव सारंग साळवे, सुभाष खोबरे, गजानन परचाके उपस्थित होते.
































