डॉ.अशोक नेते यांची पूरग्रस्त गावांना भेट, गावकऱ्यांशी संवाद

आवश्यक कार्यवाहीसाठी सूचना

गडचिरोली : गोसीखुर्द धरणातून सुरू असलेल्या मोठ्या विसर्गामुळे वैनगंगा नदीसह इतर नद्यांना आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या गावांना, शेतीला मोठा फटका बसला आहे. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांनी काही पुरग्रस्त भागात भेट दिली. गावकऱ्यांशी संवाद साधत त्यांना दिलासा दिला, तसेच प्रशासकीय यंत्रणेला योग्य ती कार्यवाही लवकर करावी, अशी सूचना केली.

नुकसानीची माहिती घेत डॉ.नेते यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून शेती पिकांचे नुकसान, घरांची पडझड, जनावरांचे हाल व अन्नधान्याचे नुकसान याबाबत सविस्तर माहिती घेतली.

या पुरामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल शासनदरबारी मांडून तातडीची मदत मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल, असा विश्वास त्यांनी नागरिकांना दिला.

नागरिकांना दिल्या सतर्क राहण्याच्या सूचना

नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी त्वरित सावधगिरी बाळगावी, जनावरे, धान्य व शेती साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे, अनावश्यक हालचाली व नदीकाठच्या भागात जाणे टाळावे, स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

सावली येथे आले असताना डॉ.नेते यांना कवठी पारडी व हरणघाट रस्त्यांची दयनीय अवस्था, धानपिकाचे नुकसान, गावांतील पायाभूत सुविधांचा अभाव, संपर्क यंत्रणांची अडचण यावर स्थानिक पदाधिकारी आणि गावकऱ्यांनी गंभीर मुद्दे उपस्थित केले. यावेळी समन्वयातून उपाययोजना करण्याची सूचना त्यांनी केली.

पूरपरिस्थितीची पाहणी करताना सोबत मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.प्रणय खुणे, अरुण हरडे, अविनाश पाल, डॉ.भारत खटी, किशोर वाकुडकर, पं.स.माजी सभापती छाया शेंडे, राकेश गोलेपल्लीवार, सुरज किनेकर, दीपक शेंडे, जितेश सोनटक्के, विनोद धोटे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.