चामोर्शी तालुक्यातील रस्त्यांचा प्रश्न मांडणार मुख्यमंत्र्यांकडे

डॅा.नेते यांचा अधिकाऱ्यांना इशारा

गडचिरोली : पावसामुळे जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची अवस्था दयनिय झाली आहे. गडचिरोली-चामोर्शी या मुख्य मार्गापासून ते वैनगंगा, पोहरा नदीवरील पुलापर्यंत, तसेच चामोर्शी-घोट-गौरीपूर-श्रीनिवासपूर रस्ता, आणि चामोर्शी ते भेंडाळा-हरणघाट-मूल या मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. त्यामुळे माजी खासदार तथा भाजपचे राष्ट्रीय महामंत्री (अनु.जनजाती मोर्चा) अशोक नेते यांनी शुक्रवारी या रस्त्यांची पाहणी केली. सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक-2 अंतर्गत येणाऱ्या या रस्त्यांची तातडीने दुरूस्ती सुरू न केल्यास संबंधितांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशारा त्यांनी दिला. (अधिक बातमी खाली वाचा)

विशेष म्हणजे चामोर्शी ते भेंडाळा-हरणघाट या मार्गावर जेमतेम दिड वर्षापूर्वी डांबरीकरण झाले आहे. त्यानंतर एकदा खड्ड्यांची दुरूस्तीही झाल्याचे सांगितले जाते. तरीही हा मार्ग पुन्हा उखडल्याने संतप्त नागरिकांनी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर रोष व्यक्त केला. यावेळी नागरिकांसोबत रस्त्याने चालत जाऊन डॅा.नेते यांनी नागरिकांना किती त्रास सहन करावा लागतो हे प्रत्यक्ष अनुभवले. अनेक ठिकाणी खोल खड्डे, पाण्याने भरलेल्या चिखलयुक्त भागातून जाताना तेथील नागरिकांनी आपल्या व्यथा त्यांच्याजवळ मांडल्या. यावेळी बांधकाम विभागाच्या चामोर्शी येथील उपअभियंत्यांना बोलविले असताना दोन कनिष्ठ अभियंता तिथे पोहोचले. रस्त्यांची दुरवस्था दाखवत त्यांनी या रस्त्यासाठी स्थायी उपाययोजना करण्याची सूचना केली. रस्त्याची डागडुजी करताना थातूरमातूर काम न करता बोल्डर गिट्टी आणि चुरी भरून मजबूत काम करण्याची सूचना त्यांनी केली. या कामाकडे दुर्लक्ष केल्यास मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संबंधितांची तक्रार करण्याचा इशारा त्यांनी दिला.

रुग्णांना धोका — अपघातांची शक्यता

पावसात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने हे खड्डे दिसतच नाहीत. त्यामुळे दुचाकीस्वार, रुग्णवाहिका आणि शाळा-कॅालेजला जाणारी वाहने यांना दररोज अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांना नागपूर-चंद्रपूरकडे याच मार्गाने जावे लागते. त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

या रस्ते पाहणी दौऱ्यात भाजपचे जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे, तालुकाध्यक्ष रोशनी वरघंटे, नगरसेवक आशिष पिपरे, कनिष्ठ अभियंता चंद्रकांत डवरे, भिकाजी सातपुते, महादेव चलाख, रामचंद्र भांडेकर, विकेश चलाख तसेच मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.