
गडचिरोली : जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे कार्य राज्य सरकारकडून सुरू आहे. परंतु विविध तालुक्यात जिल्हा परिषद शाळेच्या इमारती मोठ्या प्रमाणात मोडकळीस आलेल्या आहेत. अनेक शाळा इमारती निर्लेखनासाठी तयार आहेत, परंतु त्याकडे कुणाचेच लक्ष नाही. विद्यार्थ्यांना व शाळेतील गुरुजणांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागत आहे. याकडे राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॅा.प्रणय खुणे यांनी लक्ष वेधत सदर शाळा इमारतींची पुनर्बांधणी करण्याची मागणी केली आहे.
चामोर्शी तालुक्यातील चापलवाडा येथे डॉ.प्रणय खुणे यांनी भेट दिल्यानंतर ग्रामीण भागातील शिक्षण सुविधांबाबत नाराजी व्यक्त केली. चापडवाडा येथील जिल्हा परिषद शाळा अखेरची घटका मोजत असल्याचे दिसून आले. याबाबत शाळा व्यवस्थापन समितीने वारंवार सूचना देऊनसुद्धा अजूनपर्यंत त्याकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक शाळांची अशीच दूरवस्था आहे असे खुणे यांनी सांगितले.
गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषद शाळांच्या व्यवस्थेकडे प्राधान्याने लक्ष द्यावे आणि शाळा इमारतींचे नवीनीकरण करण्याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अशी मागणी केली. तसेच जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी तात्काळ ही समस्या मार्गी लावावी, अशी मागणी केली. यावेळी मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते माजी सरपंच रमेश लेकलवार, सत्यवान तंटकवार, राजू सातपुते यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
































