गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाने शेतकऱ्यांकडून आधारभूत किमतीनुसार खरेदी केलेल्या धानाचे तीन महिन्यांपासून थकित असलेले चुकारे तातडीने देण्यासाठी शुक्रवारी आरमोरी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार कृष्णा गजबे यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांची भेट घेतली. आरमोरी विधानसभा क्षेत्रातील आदिवासी शेतकऱ्यांच्या चुकाऱ्यासाठी 10 कोटी रुपये तात्काळ वळते करण्याची सूचना आदिवासी विकास महामंडळाला करण्यात आल्याची माहिती आ.गजबे यांच्या कार्यालयाने दिली.
मा.आ.गजबे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनाही निवेदन दिले. त्यानुसार आरमोरी विधानसभा क्षेत्रातील आदिवासी शेतकऱ्यांच्या चुकाऱ्यासाठी 10 कोटी रुपये तात्काळ वळते करण्याची सूचना आदिवासी विकास महामंडळाला करण्यात आली.
तीन महिन्यांपासून चुकारे प्रलंबित असल्याने शेतकरी, आदिवासी विविध कार्यकारी संस्था आर्थिक अडचणीत आल्या होत्या. त्यांची व्यथा गजबे यांनी मुंबई दरबारी मांडल्यानंतर चुकारे देण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्यामुळे लवकरच आदिवासी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची आशा निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
































