गडचिरोली : जिल्ह्याच्या दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या सिरोंचा ते आलापल्ली (राष्ट्रीय महामार्ग 353-सी) या रखडलेल्या महामार्गाच्या कामाला अखेर गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अनेक वर्षांपासून संथगतीने सुरू असलेल्या या कामाला गती देण्यासाठी माजी खासदार डॅा.अशोक नेते यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले. त्यामुळे केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्यांना पत्र देऊन या मार्गाच्या कामाला गती देण्याची सूचना केली आहे.
मागील अनेक वर्षांपासून खराब रस्ते आणि अपूर्ण कामामुळे स्थानिक नागरिक, विशेषतः आदिवासी बांधव मोठ्या अडचणींचा सामना करत होते. आरोग्य सेवा, शिक्षण व रोजगाराच्या संधींवर याचा प्रतिकूल परिणाम होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन डॉ.अशोक नेते यांनी 1 एप्रिल 2026 रोजी केंद्र सरकारकडे सविस्तर निवेदन सादर करून या मार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली होती.
केंद्र सरकारकडून दखल
निवेदनाची दखल घेत भारत सरकारच्या रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने तातडीने पावले उचलली. मंत्रालयाचे तांत्रिक सल्लागार बाळासाहेब ठेंग यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता (मुंबई) तसेच अधीक्षक अभियंता (नागपूर) यांना लेखी आदेश जारी केले. 7 एप्रिल 2026 रोजी दिलेल्या निर्देशांमध्ये या महामार्गाचे महत्त्व अधोरेखित करत, कामातील अडथळे दूर करून ते जलदगतीने पूर्ण करण्याची सूचना देण्यात आली आहे.
विकासाची जीवनवाहिनी
हा मार्ग केवळ रस्ता नसून या भागातील व्यापार, वाहतूक आणि सर्वांगीण विकासाची जीवनवाहिनी आहे. दुर्गम भागातील नागरिकांचा विकास रखडू नये, हीच माझी भूमिका आहे, असे मत डॉ.अशोक नेते यांनी व्यक्त केले.
या महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर सिरोंचा ते आलापल्ली प्रवास अधिक जलद व सुरक्षित होईल. स्थानिक शेतमाल व व्यापाराला मोठी चालना मिळेल. आरोग्य व आपत्कालीन सेवा वेळेत उपलब्ध होतील. यातून दुर्गम भागातील विकासाला नवी दिशा मिळेल. डॉ.अशोक नेते यांचे प्रयत्न आणि प्रशासनाच्या सकारात्मक प्रतिसादामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
































