वाघाच्या हल्ल्यातील मृत महिलांच्या कुटुंबियांची डॉ.नेते यांनी घेतली भेट

आर्थिक मदतीसह कारवाईची सूचना

आरमोरी : तालुक्यातील देऊळगावच्या सरस्वताबाई झिंगरजी वाघ आणि मुक्ताबाई दिवाकर नेवारे या दोन वृद्ध महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर हादरलेल्या कुटुंबियांची माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॅा.अशोक नेते यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच त्यांना आर्थिक मदत करत अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वनविभागाने तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या.

सरस्वताबाई वाघ दि.12 नोव्हेंबर रोजी सरपण गोळा करण्यासाठी जंगलात गेल्या होत्या. पण त्या बाहेरगावी गेल्या असे समजून कुटुंबियांनी शोध घेतला नव्हता. दुसरीकडे मुक्ताबाई नेवारे या सुद्धा सरपण गोळा करत असताना वाघाने केलेल्या हल्ल्यात त्या ठार झाल्या. त्याच दिवशी सरस्वताबाईचाही मृतदेह त्या परिसरातील जंगलात आढळला. त्यामुळे दोन्ही महिलांचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यातच झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

यावेळी डॅा.नेते यांनी कुटुंबियांशी केलेल्या संवादातून त्यांच्या व्यथा समजून घेतल्या. त्यांना धिर देत त्यांचे सांत्वन केले. यावेळी डॉ.नेते यांनी मुख्य वनसंरक्षक रमेशकुमार यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून संबंधित वाघाला तातडीने पकडण्याची आणि पीडित कुटुंबीयांना त्वरित सरकारी मदत देण्याची सूचना केली.

या सांत्वन भेटीच्या वेळी जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे, मनोहर सुंदरकर, पंकज फुरेल्लीवार, नरेंद्र बनपुरकर, विकास पायडलवार, योगाजी कुकुडकर, डॉ.कुमरे, पंकज जांबुळे, तिजेंद्र गरमळे, सौरभ सुंदरकर, रवि ननावरे, कुमार सुंदरकर तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.