मा.खा.डॅा.अशोक नेते यांनी जाणल्या गांधीनगरच्या समस्या

प्रामाणिक प्रयत्न करण्याची ग्वाही

मुलचेरा : तालुक्यातील गांधीनगर येथे माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांनी सदिच्छा भेट देऊन परिसरातील गावकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन विविध प्रलंबित विकास कामांचा आढावा घेतला. गावकऱ्यांनी सांगितलेल्या समस्या लवकरात लवकर दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्याची ग्वाही यावेळी डॅा.नेते यांनी दिली.

गांधीनगर येथील नागरिकांशी संवाद साधताना मा.खा.डॉ. नेते म्हणाले, आपल्या सहकार्याने मी दोन वेळा खासदार झालो; विकास हीच माझी बांधिलकी आहे. आजही आपण सांगितलेल्या प्रत्येक समस्येवर प्रामाणिकपणे उपाय करण्याचा संकल्प आहे, असे सांगत त्यांनी मुद्देसूद आढावा घेतला. यात मूलभूत सुविधा, रस्ते व कृषीविषयक गरजा केंद्रस्थानी होत्या.

गांधीनगर, लक्ष्मीपूर आणि आसपासच्या गावांनी मांडलेल्या समस्यांमध्ये प्रामुख्याने धान खरेदी केंद्राची तातडीची आवश्यकता, विद्यमान गोदाम अपुरे असल्याने नवीन मोठ्या क्षमतेच्या गोदामाची मागणी गावकऱ्यांनी केली. एमआरईजीएस योजनेची कामे पूर्ण, मात्र निधी प्रलंबित असल्याचे दिसून आले. त्यावर डॉ.नेते यांनी पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली.

लक्ष्मीपूर व परिसरातील गावात सीसी रोडची मागणी, तसेच सभामंडप उभारणीची गरज, पांजण रस्ता दुरुस्तीची मागणी, स्मशानभूमीची सुविधा आदींवर भर देण्यात आला.

धान खरेदी केंद्रासाठी अधिकाऱ्याशी संपर्क

गावकऱ्यांनी धान खरेदीच्या अडचणी मांडताच, मा.खा.डॉ.अशोक नेते यांनी धान खरेदी-विक्री अधिकाऱ्यांशी त्वरित मोबाईलवरून संपर्क साधला आणि लवकरात लवकर निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे स्पष्ट निर्देश दिले. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

आढावा बैठकीत डॉ.नेते म्हणाले, “आपल्या सर्व समस्या प्रशासनासमोर प्राधान्याने मांडून त्यांचे निराकरण करणे ही माझी जबाबदारी आहे. विकासाच्या प्रत्येक पावलावर मी आपल्या पाठीशी आहे.”

या आढावा बैठकीला प्रामुख्याने महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखा डोळस, भाजपचे मुलचेरा तालुकाध्यक्ष संजय सरकार, माजी जिल्हा परिषद सदस्य नामदेव सोनटक्के, जिल्हा सचिव बादल शहा, विधान वैद्य तथा स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.