देसाईगंज : सध्या जिल्हाभरात धान कापणीचे काम जोरात सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांची कापणी पूर्णही झाली आहे. मात्र शासकीय धान खरेदी केंद्र अजूनही सुरू न झाल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत. बाजार समित्यांमध्ये धानाला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना तोट्याने धान विकण्याची वेळ येत आहे. या पार्श्वभूमीवर देसाईगंज तालुक्यातील विविध सहकारी संस्था, शेतकरी प्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी माजी आमदार कृष्णा गजबे यांची भेट घेतली. मा.आ.गजबे यांनी शेतकऱ्यांची ही व्यथा जिल्हाधिकारी अविनाश पंडा यांच्याकडे निवेदनाद्वारे मांडून तात्काळ धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली.

“शेतकऱ्यांचा घाम वाया जाऊ देऊ नका. गरजवंत शेतकऱ्यांना नाईलाजाने अल्प दरात धान विक्री करावी लागत आहे. यात त्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे सरकारने जाहीर केलेल्या आधारभूत किमतीतच प्रत्येक शेतकऱ्याचे धान खरेदी झाले पाहिजे,” अशी आग्रही मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
या मागणीची दखल घेत जिल्हाधिकारी पंडा यांनी येत्या काही दिवसांत शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. हे निवेदन सादर करताना जिल्ह्यातील विविध खरेदी-विक्री सहकारी संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी नेते, कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून लवकरच खरेदी केंद्र सुरू होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे.
































