हत्तींकडून होणाऱ्या नुकसानीमुळे त्रस्त गावकऱ्यांचा वनविभागाच्या चमुवर रोष

हुल्ला टिमकडून कर्तव्यात कसर?

आरमोरी : गेल्या तीन आठवड्यांपासून आरमोरी तालुक्यातील मका पीकावर ताव मारत असलेल्या हत्तींमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. अशात काही गावातील शेतकरी वनविभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवरच रोष व्यक्त करताना दिसतात. चार दिवसांपूर्वी इंजेवारी गावालगतच्या शेतात हत्ती दाखल झाल्यानंतर नागरिकांच्या रोषाला आरमोरी वनविभागाच्या पथकाला बळी पडावे लागले.

वास्तविक या रानटी हत्तींना नियंत्रित करण्याची जबाबदारी पश्चिम बंगालच्या हुल्ला टिमकडे दिली आहे. वेगवेगळे कळप करून एकाचवेळी ते शेतात शिरत असल्याने सर्व हत्तींवर लक्ष केंद्रीत करणे कोणालाच शक्य होत नाही. हुल्ला टिम दुसरीकडे हत्तींच्या मागावर असताना इंजेवारीच्या नागरिकांनी आरमोरी वनविभागाच्या चमुला जबरदस्तीने आपल्यासोबत शेताकडे नेले. अशा प्रकारामुळे संबंधितांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता असते.

वास्तविक वनविभागाच्या चमूकडे केवळ हत्तींचा वावर असणाऱ्या भागातील नागरिकांना सावध करण्याची जबाबदारी आहे. हत्तींना नियंत्रित करण्याचे किंवा त्यांचा मार्ग बदलविण्याचे कौशल्य त्यांच्याकडे नाही. त्यासाठी आवश्यक असणारे साहित्यही त्यांच्याकडे नाही. ती जबाबदारी हुल्ला टिमकडे आहे. मात्र हुल्ला टिमचे सदस्यही रात्री थोडा वेळ लक्ष देऊन नंतर गावातील शाळेत येऊन झोपतात, असा आरोप गावकऱ्यांकडून केला जात आहे.

दरम्यान 31 च्या संख्येत असलेले हे हत्ती रात्री शेतात शिरताना वेगवेगळे छोटे कळप करून वेगवेगळ्या भागात जातात. त्यामुळे त्यांना नियंत्रित करताना हुल्ला टिमच्या सदस्यांनाही तारेवरची कसरत करावी लागत आहे.