गडचिरोली : आरमोरी मतदार संघासह संपूर्ण गडचिरोली जिल्हा आदिवासी, दुर्गम व नक्षलग्रस्त असून मोठ्या प्रमाणात जंगलव्याप्त असल्याने शेतकऱ्यांना रात्री शेतातील पिकांचे ओलित करताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत होता. श्वापदांच्या हल्ल्यात अनेक शेतकरी व शेतमजुरांचा बळीसुद्धा गेला. अखेर कृषिपंपांना दिवसा १२ तास वीज पुरवठा करण्याची मागणी मान्य करत दिवसा १२ तास वीज पुरवठा सुरू झाला आहे. यासंदर्भात आरमोरी मतदार संघातील नागरिकांच्या समस्या आ.कृष्णा गजबे यांनी सरकारदरबारी मांडल्या होत्या.
राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेत कृषिपंपांना दिवसा १२ तास वीज पुरवठा करण्याची आग्रही मागणी त्यांनी केली. त्या मागणी व पाठपुराव्यामुळे आरमोरी मतदार संघासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील कृषि पंपांना दि. २८ नोव्हेंबर २०२३ पासून सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत दिवसा १२ तास वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. सदर निर्णयामुळे आरमोरी मतदार संघासह सर्व भागातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.