सिरोंचा : मेडिगट्टा प्रकल्पाअंतर्गत भूसंपादन करण्यात आलेल्या शेतजमिनीपेक्षा जास्त शेतजमीन बाधित होत असतानाही त्या शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आलेला नाही. यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी तिरुपती मुद्दाम यांच्या नेतृत्वाखाली सिरोंचा येथील तहसील कार्यालयासामोर साखळी उपोषण सुरू केले आहे.
यासंदर्भात बाधीत शेतकऱ्यांनी सांगितले की, त्यांची शेतजमीन आरडा माल येथील सर्वे क्रमांक 127 मध्ये आहे. ही शेतजमीन प्रकल्प बांधल्यापासून बॅकवॅाटरमुळे दरवर्षी पाण्याखाली जात आहे. मेडिगट्टा प्रकल्प बांधत असताना त्यांच्या शेतजमिनीचे भुसंपादन होईल म्हणून मार्किंगसुद्धा करण्यात आले होते. एवढेच नाही तर संबंधित शेतकऱ्यांना नोटीससुद्धा देण्यात आल्या, परंतु अंतिम यादीत त्यांचे नाव आले नाही. या विषयावर अनेक वेळा निवेदने देऊनही न्याय मिळाला नाही.
अनेक शेतकऱ्यांची जमीन बॅकवॉटरमुळे बुडत असूनही भुसंपादनाच्या यादीमध्ये त्यांचे नाव आलेले नाही. या समस्येसंदर्भात शासन व प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष देऊन पुनश्च सर्वे करून बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली.
मंगळवारी साखळी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी तिरुपती मुद्दाम, राम रंगुवार, मांतय्या अटला, विश्वनाथ रिक्कूला आदी शेतकरी उपोषणास बसले होते.