गडचिरोली : राज्यात सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात वनरक्षकांच्या २०० जागांच्या भरतीची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी राज्याच्या अनेक भागातील १० हजार ४२४ उमेदवार पात्र ठरले आहेत. त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करून शारीरिक क्षमता चाचणी घेतली जात आहे. यासाठी राज्याच्या विविध जिल्ह्यांमधून आलेल्या बेरोजगार युवकांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केल्यामुळे त्या युवकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
वनरक्षक पदाच्या भरतीसाठी वनविभागाने घेतलेल्या आॅनलाईन परिक्षेत ज्यांनी ४५ टक्केपेक्षा जास्त गुण मिळवले त्यांना शारीरिक क्षमता चाचणीसाठी बोलविण्यात आले. ८७०४ मुले, १७२० मुली असे एकूण १० हजार ४२४ उमेदवार या चाचणीसाठी पात्र ठरविण्यात आले. पुरूषांसाठी ५ किलोमीटरची तर महिलांसाठी ३ किलोमीटरची रनिंग चाचणी ठेवली आहे. तत्पूर्वी कागदपत्रांची तपासणी केली जाते. त्यामुळे दररोज मोठ्या संख्येने युवक गडचिरोलीत येत आहेत. २१ ते ३० जानेवारीपर्यंत पुरूष उमेदवारांची चाचणी होणार असून ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारीला महिला उमेदवारांची चाचणी होणार आहे.
शारीरिक क्षमता चाचणीसाठी येणाऱ्या सर्व गरजवंत युवक-युवतींना आर्थिक भुर्दंड पडू नये आणि त्यांना थंडीत बाहेर कुठे उघड्यावर राहावे लागू नये यासाठी निवाऱ्याची आणि त्यांच्या भोजनाचीही सोय राष्ट्रवादी युवक काँग्रेसने ना.धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात आणि रायुकाँचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर यांच्या नेतृत्वात पटेल मंगल कार्यालयात केली आहे.