गडचिरोली : गडचिरोली ते आरमोरी या राष्ट्रीय महामार्गाचे डांबरीकरण करून नुतनीकरण करण्यासाठी 8 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या दृष्टिने जिल्ह्यात सर्वाधिक वर्दळीच्या असलेल्या या मार्गाची दूरवस्था दूर होऊन वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे या मार्गाची केवळ डागडुजी न करता नुतनीकरण करावे, यासाठी आ.कृष्णा गजबे यांनी प्रयत्न केले होते, त्याला यश आले.
आमदार गजबे यांनी राष्ट्रीय महामार्ग असलेल्या आरमोरी ते गडचिरोलीपर्यंत जाणाऱ्या मार्गाच्या दुरवस्थेची स्वतः पाहणी केल्यानंतर नागरिकांना होत असलेल्या त्रासाची कल्पना त्यांना आली. त्यामुळे त्यांनी केवळ डागडुजी करून खड्डे बुजवण्यास विरोध करत मार्गाचे नुतनीकरण करण्याचा आग्रह धरला. त्यानुसार नुतनीकरणासाठी मंजुरी मिळून त्यासाठी 8 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. नुकतीच निविदा प्रक्रियाही पार पडली.
सद्यस्थितीत देसाईगंज-कुरखेडा, देसाईगंज-लाखांदूर, देसाईगंज- ब्रम्हपुरी हा मुख्य डांबरीकरण मार्ग सुकर झाल्याचे दिसून येत आहे. परंतू आरमोरी ते गडचिरोली मार्गावर दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहनांची वर्दळ असताना या मार्गावर मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. खड्डे चुकवताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशात खड्ड्यांची डागडुजी केल्यास पुन्हा तीच अवस्था होऊ शकते; ही बाब आमदार गजबे यांच्या लक्षात येताच त्यांनी डागडुजी न करता सरळसरळ नुतनीकरण करण्याची सूचना केली. त्यानुसार आरमोरी ते गडचिरोलीपर्यंत मुख्य डांबरीकरण कामासाठी 8 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. पोर्ला गावापासून कामाला सुरुवातही करण्यात आली आहे.