गडचिरोली : लोकशाहीच्या उत्सवात नागरिकांना मतदानाचे कर्तव्य निर्भय वातावरणात पार पाडता यावे यासाठी पोलीस दलाने संरक्षणाची मोठी जबाबदारी पार पाडली. जिल्हा पोलीस दलासोबत बाहेरून आलेल्या निमलष्करी दलाच्या जवानांनीही आपली जबाबदारी पार पाडताना मतदान केंद्रावर आलेल्या वृद्ध, दिव्यांगांना मदतीचा हात दिला. त्यांच्या या सहृदयतेने त्यांच्यात कणखरपणासोबत एक संवेदनशिल माणूसही असल्याचा अनुभव अनेकांनी घेतला.
दुसरीकडे नागपूर शहर पोलिसांच्या एका शिपायाने गडचिरोलीतील सखी मतदान केंद्रावर याविरूद्ध उद्धट वागणूक देऊन अनेक मतदारांना मनस्ताप दिला. जिल्हा पोलिसांच्या मदतीला नागपूर शहर आणि ग्रामीण मधील काही पोलीस कर्मचाऱ्यांना पाठविण्यात आले होते. त्यातील दोघांची गडचिरोलीतील सखी मतदान केंद्राबाहेर ड्युटी लावण्यात आली होती. पंचायत समितीच्या आवारातील मिटिंग हॅालमध्ये असलेल्या या केंद्रात जाण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना घेऊन आलेले कुटुंबातील सदस्य आतील भागातील मोकळ्या जागेत दुचाकी लावण्याची विनंती करत होते. मात्र तेथे तैनात नागपूर शहर पोलिसांचा शिपाई (ब.नं.21269) हा सर्वांसोबत उद्धटपणे वागत होता. मी कोणालाच आतमध्ये वाहन नेऊ देणार नाही असे सांगत तो मुख्य मार्गावर (राष्ट्रीय महामार्ग) वाहन ठेवायला सांगत होता.
पंचायत समितीच्या आवारातील केंद्राबाहेर 50 पेक्षा जास्त दुचाकी वाहने उभी राहू शकतील एवढी मोकळी जागा असताना मुख्य मार्गावर वाहने ठेवण्यासाठी प्रवृत्त करणे आपघाताला आमंत्रण देणारे होते. याशिवाय वृद्धांसाठीही वाहन आत नेऊ देण्यास मज्जाव करणाऱ्या या शिपायाचा उद्धटपणा गडचिरोली पोलिसांच्या सहृदयतेच्या एकदम विरूद्ध होता. त्यामुळे अनेक मतदारांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.