सिरकोंडा परिसरातील लोकांना मिळणार इंटरनेट कव्हरेज

धर्मरावबाबांच्या पुढाकाराने गती

सिरोंचा : तालुक्यातील दुर्गम भागातील नागरिकांना एकमेकांशी संपर्क साधण्यास अडचणी येऊ नये या हेतूने तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या सिरकोंडा, गंगनूर, कोत्तागुडम या तीन गावांत खासगी कंपनी जिओचा मोबाईल टॉवर उभारण्यात आला, मात्र अनेक महिने लोटूनही सदर टॉवर सुरु झाला नाही. नागरिकांना जात असलेल्या समस्येचा विचार करून आ.डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांनी संबंधित कंपनीच्या व्यवस्थापकांना खडे बोल सुनावत ही सेवा सुरळीत सुरु करण्याचे निर्देश दिले़. त्यामुळे टॅावरवरील तांत्रिक कामांना सुरूवात करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष बानय्या जनगाम व सिरकोंडाचे सरपंच लक्ष्मण गावडे यांनी नागरिकांना मोबाईल आणि इंटरनेट कव्हरेजसाठी येत असलेल्या समस्येकडे आ.धर्मरावबाबा आत्राम यांचे लक्ष वेधले होते. त्यामुळे धर्मरावबाबा यांनी संबंधितांना निर्देश देत अर्धवट असलेले काम पूर्ण करण्यास सांगितले. त्यामुळे परिसरातील नागरिकांना आता लवकरच जिओ नेटवर्क सेवा मिळणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे़.