पायाभूत सुविधांसह वने, खनिजांवर आधारित उद्योगातून रोजगार वाढवा

गडचिरोलीतील बैठकीत राज्यपालांची सूचना

गडचिरोली : जिल्ह्यात रस्ते, रेल्वे या विकासात्मक कामांसोबतच पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. यासोबतच वने व खनिज साधनसंपदेवर आधारित उद्योगांच्या उभारणीतून रोजगारात वाढ करावी आणि आदिवासीबहुल क्षेत्राच्या सर्वांगिन विकासाला प्रोत्साहन द्यावे, अशी सूचनावजा अपेक्षा राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन बुधवारी गडचिरोलीच्या विश्रामभवनात घेतलेल्या विभाग प्रमुख अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत केली.

प्रभारी जिल्हाधिकारी आयुषी सिंह यांनी जिल्ह्याची ऐतिहासिक व सांस्कृतिक माहिती, उद्योग व शासकीय विकास योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या कामांची आणि पुढील नियोजनाची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

गडचिरोली जिल्हा नैसर्गिक वने व खनिज साधनसंपदेने नटलेला आहे. यावर आधारित उद्योग, रोजगारांत वाढ करून आदिवासीबहुल क्षेत्राच्या सर्वांगिन विकासाला प्रोत्साहन देण्याची अपेक्षा राज्यपालांनी केली. जिल्ह्यात स्त्री-पुरूष साक्षरतेत मोठी दरी असून महिलांना अधिक शिक्षित करण्यासाठी प्रयत्न करणे, दुर्गम भागातील नागरिकांना जीविकेसाठी वनपट्टे, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहिम राबविणे, आदिवासींचे हक्क हिरावून घेणाऱ्यांवर कडक कारवाई करणे आदी सूचना त्यांनी यावेळी दिल्या. मनरेगा कामात जिल्ह्यात झालेल्या चांगल्या कामांचे त्यांनी कौतुक केले.

आरोग्य सेवेचा आढावा घेताना जिल्हा रूग्णालयात कोणकोणत्या शस्त्रक्रियांची सुविधा आहे याबाबत विचारणा करून जेथे पेशन्ट रेफर करण्यात येते, त्या नागपूर येथील वैद्यकीय रुग्णालयात गडचिरोली जिल्ह्यातील रूग्णांसाठी एक समन्वयक नेमावा, जेणेकरून संबंधित रूग्णांना मदत होईल. जिल्ह्यात एकलव्य आदिवासी शाळांची संख्या वाढवण्यासाठी मागणी करावी, तसेच मलेरिया निर्मूलनासाठी विशेष मोहिम राबविण्याचे व त्यासाठी विशेष निधी मंजूर करण्यासाठी आपण पाठपुरावा करू असेही राज्यपाल म्हणाले. पुढील दौऱ्यात आदिम जनजातीच्या गावांत भेट देईल व कोणत्याही कारणास्तव ही भेट रद्द होणार नाही, अशी ग्वाहीदेखील त्यांनी यावेळी दिली.