भामरागड : पोलीस दलाकडून नव्याने उभारलेल्या अतिदुर्गम अशा बिनागुंडा पोलीस मदत केंद्राच्या आवारात प्रथमच मोठे आरोग्य शिबिर आयोजित केले होते. यात बिनागुंडा, कुवाकोडी, फोदेवाडा व आसपासच्या अतिदुर्गम गावांतील 250 हून अधिक नागरिक आणि विद्यार्थ्यांची तज्ज्ञ वैद्यकीय पथकाकडून तपासणी करण्यात आली.
पोलीस रुग्णालय गडचिरोली, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा परिषद आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आाला. जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहचविण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाकडून विविध आरोग्य मेळावे आयोजित केले जातात. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने नवनिर्मित पोमके बिनागुंडा येथे या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा लहाडे (स्त्रीरोग तज्ज्ञ), महिला व बाल रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.माधुरी किलनाके (सर्जन), डॉ.प्रशांत पेंदाम (बालरोग तज्ज्ञ), पोलीस रुग्णालय गडचिरोलीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.सुनील मडावी, डॉ.गणेश चिचघरे, तसेच सीआरपीएफच्या बटालियन 9 चे वैद्यकीय अधिकारी डॉ.डी.एस.मोहन यांच्या नेतृत्वात नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
14 नागरिकांची होणार पुढील तपासणी
अतिदुर्गम भागातील नागरिकांमध्ये आरोग्य सुविधांविषयी जनजागृती करुन नागरिकांना विविध तपासण्या आणि औषधोपचाराचा मोफत लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध आजारांविषयी व पोषण समस्यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तपासणीनंतर 14 नागरिकांना आवश्यकतेनुसार विविध रुग्णालयांच्या ठिकाणी पुढील तपासणीसाठी शिफारस करण्यात आली. तसेच बालरोग तज्ज्ञांकडून शालेय विद्यार्थ्यांची तपासणी आणि स्त्रीरोग तज्ज्ञांकडून गरोदर माता व इतर महिलांची तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.
पोलिसांच्या पुढाकाराने घेतली 178 शिबिरे
गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने सन 2021 पासून आजपर्यंत एकूण 178 आरोग्य मेळाव्यांच्या माध्यमातून एकूण 40,015 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच एकूण 5 रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून 4,361 युनिट रक्तसंकलन करण्यात आले आहे. यासोबतच ऑपरेशन रोशनीच्या माध्यमातून एकूण 9,971 पेक्षा अधिक नागरिकांची नेत्र तपासणी करुन 1,412 नागरिकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
सदर शिबिराचे आयोजन पोलीस अधीक्षक नीलोत्पल, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, सीआरपीएफ कमांडंट शंभु कुमार, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., पोलीस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे तसेच प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी (भामरागड) अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली नवनिर्मित पोमकें बिनागुंडाचे प्रभारी अधिकारी सपोनि.रोहन पाटील यांच्या नेतृत्वात पोउपनि रोहन शिरसाट, सागर मोरे, शुभम भगत व अंमलदारांनी यशस्वीरित्या पार पाडले.
































