
गडचिरोली : मुलचेरा तालुक्यात डेंग्युचा प्रकोप झाल्यानंतर पाचवा बळी गेला. काकरगट्टा येथील एका डेंग्युग्रस्त महिलेचा मृत्यू झाला आहे. आरोग्य यंत्रणेने ही साथ नियंत्रणात आणण्यासाठी आता युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. आतापर्यंत 13 गावांमध्ये कीटकनाशकाची फवारणी, तर 5 गावांमध्ये धूरफवारणी करण्यात आली आहे. दिवसरात्र धूरफवारणी केली जात आहे. दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा.प्रताप शिंदे यांनी लगाम, काकरगट्टा या गावांना भेटी देऊन नागरिकांसोबत संवाद साधला. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील व्यवस्थेचा आढावा घेतला.
डॅा.शिंदे यांनी डेंग्यू प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची पाहणी केली. गेल्या काही दिवसांपासून प्रा.आ. केंद्र लगामच्या कार्यक्षेत्रातील गावात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य विभाग विविध उपाययोजना राबवत आहे. या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि गावातील काही घरांना भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. त्यांनी गावातील रहिवाशांसोबत संवाद साधून त्यांना डेंग्यूची लक्षणे, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबद्दल मार्गदर्शन केले, प्रत्यक्षात डास अळी सापडलेल्या ठिकाणी तेथील राहिवाश्यांनाही मार्गदर्शन केले.
आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन डासांच्या उत्पत्तीस्थानांचा शोध घ्यावा आणि ती नष्ट करावीत. तसेच, ताप आलेल्या रुग्णांची तातडीने तपासणी करून योग्य उपचार देण्याचे निर्देशही त्यांनी आरोग्य कर्मचार्यांना दिले.
गावकऱ्यांना केले आवाहन
यावेळी त्यांनी गावकऱ्यांना आवाहन केले की, त्यांनी आपल्या घराच्या परिसरात पाणी साचू देऊ नये, जुन्या टायर, नारळाच्या करवंट्या किंवा इतर साहित्यात पाणी जमा होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच, आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळून पाण्याची भांडी रिकामी करावीत.
येल्ला, काकरगट्ट्यांत आरोग्य पथक
येल्ला काकर गट्टा गावांत आरोग्य पथक तैनात करण्यात आले आहे.मुबलक औषधी, रुग्णवाहीका उपलब्ध ठेवण्यात आली आहे.डेंग्यू उद्रेक गावांत धुरफवारणी युद्धपातळीवर सुरु आहे,आरोग्य विभाग गावातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, आवश्यकतेनुसार पुढील उपाययोजना केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ पंकज हेमके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ विनोद मशाखेत्री उपस्थित होते.
साथरोग प्रतिबंधासाठी आतापर्यंत केलेली कार्यवाही
एकुण टिम : 29, कीटकनाशकाची फवारणी केलेली गावे : 13, धुरफवारणी पूर्ण झालेली गावे : 5, RDK ने तपासणी : 293, एकूण घेतलेले रक्तनमुने : 144, एकूण डेंग्यू तपासणी : 690, आढळून आलेले तापाचे रुग्ण : 211, दुषित आढळून आलेले डेंग्यू रुग्ण : 118, दुषित आढळून आलेले हिवताप रुग्ण : 0, भरती असलेले रुग्ण : 28 एवढे असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.