गडचिरोली : आपले पद, प्रतिष्ठा यापेक्षा एखाद्या जीवाचे प्राण जास्त मोलाचे आहे, असा विचार करत लॅायड्स मेटल्स अॅन्ड एनर्जी लिमिटेडचे (एलएमईएल) व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरन यांनी हार्टअटॅक आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला स्वत:च्या हेलिकॅाप्टरने नागपूरला नेले. विशेष म्हणजे यावेळी त्या हेलिकॅाप्टरचे सारथ्य (पायलट) त्यांनी स्वत: केले. त्यांच्या स्वभावातील ही सतर्कता, सहृदयता आणि आस्था चर्चेचा विषय झाली आहे.
झाले असे की, बी.प्रभाकरन हे सुरजागड लोहखनिज खाणींच्या नियमित तपासणीसाठी हेडरी येथे गेले होते. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास, एसआरपीएफ ग्रुप-2 मध्ये कार्यरत असलेले आणि हेडरी पोलिस ठाण्यात तैनात असलेले पोलीस नाईक राहुल साहेबराव गायकवाड (37 वर्ष) हे छातीत दुखत असल्याची तक्रार घेऊन लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटलच्या बाह्यरुग्ण विभागात गेले. ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आणि त्यानंतर केलेल्या ईसीजी तपासणीत त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे दिसून आले. त्यांना ताबडतोब अतिदक्षता विभागात (आयसीयू) हलवण्यात आले. त्यांच्यावर तातडीने योग्य ते औषधोपचार करण्यात आले, मात्र त्यांना तातडीने विशेष हृदयोपचाराची सुविधा असणाऱ्या रुग्णालयात हलवण्याची आवश्यकता होती. रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी पोलीस विभागाने एलएमईएलच्या शीर्ष व्यवस्थापनाशी संपर्क साधून गायकवाड यांना नागपूरमधील विशेष हृदयोपचार रुग्णालयात वैद्यकीय स्थलांतरासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्याची विनंती केली.
यावेळी बी.प्रभाकरन त्याच भागात असल्याने त्यांना याबद्दल कळताच त्यांनी आपले हेलिकॉप्टर तातडीने उपलब्ध करून दिले. एवढेच नाही तर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी आपल्या नियोजित बैठकांना बाजुला ठेवल्या आणि त्यांच्यातील अनुभवी पायलट जागृत केला. स्वत: पायलटची जागा घेऊन त्यांनी हेलिकॅाप्टर दुपारी 2:45 वाजता हेडरी सशस्त्र पोलीस चौकीच्या हेलिपॅडवर उतरले आणि रुग्णाला घेऊन नागपूरला रवाना झाले. यादरम्यान रुग्णाच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यासाठी रुग्णालयातील नर्सिंग कर्मचारी सोबत होते. दुपारी 3:40 च्या सुमारास हेलिकॉप्टर नागपूर विमानतळावर उतरले. त्या ठिकाणी ऑरेंज सिटी हॉस्पिटलमधील एक क्रिटिकल केअर रुग्णवाहिका रुग्णाला हलवण्यासाठी सज्ज होती. तपासणीदरम्यान रुग्णाची एक धमनी ब्लॉक असल्याचे आढळून आले. रुग्णाची स्थिती नियंत्रणात आणल्यानंतर स्टेंट यशस्वीरित्या बसवण्यात आला. आता त्यांची प्रकृती चांगली असून वेळेवर मदत मिळाल्यामुळे गायकवाड यांचे प्राण वाचले.
हजारो कोटींची गुंतवणूक करून कारभार सांभाळणाऱ्या एका उद्योगपतीने स्वत: हेलिकॅाप्टर चालवून रुग्णाला तातडीने उपचार मिळून त्याचे प्राण वाचविण्यासाठी दाखविलेली तत्परता क्वचितच कुठे पहायला मिळते. प्रभाकरन यांच्याकडे विमान आणि हेलिकॉप्टर दोन्हीसाठी खाजगी पायलटचा परवाना आहे. त्यांना एक दशकाहून अधिक काळ उड्डाणाचा अनुभव आहे. त्या अनुभवाचा त्यांनी या घटनेच्या निमित्ताने परिचय दिला.