अखेर वांगेपल्लीतून जड वाहनांची वाहतूक बंद

माजी जि.प.अध्यक्ष व बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांच्या इशाऱ्याची दखल

अहेरी : तालुक्यातील वांगेपली गावातून केली जाणारी जड वाहनांची वाहतूक अखेर बंद करण्यात आली आहे. या वाहतुकीमुळे होणारा त्रास पाहता ती या मार्गाने करू नये यासाठी आविसं नेते अजय कंकडालवार यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.

दररोज जड वाहनांची आल्लापल्ली ते अहेरी या मार्गावरून तेलंगणाकडे, तसेच तेलंगणावरून वांगेपल्लीकडे वाहतुकीची वर्दळ सुरू होती. या वाहतुकीमुळे गावातील रस्ते खराब होऊन नागरिकांना व व्यापाऱ्यांना धुळीचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. जीवित हाणीही होण्याची शक्यता बळावली होती. त्यामुळे सदर रस्त्यांवरील जड वाहनांची वर्दळ बंद करण्यात यावी अन्यथा आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते, माजी जि.प.अध्यक्ष व बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वाखाली, आणि बाजार समितीचे उपसभापती रविंद्रबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

यासाठी वांगेपल्ली येथील सरपंच दिलीप मडावी, उपसरपंच राजेश कोतपल्लीवार, सदस्य संजय आत्राम, कल्पना मडावी, प्रियंका तोडसाम, निलेश आलाम, संतोष येरमे, महेश नैताम, बाबुराव नागपुरे, ईश्वर सिडाम व गावातील समस्त नागरिकांनी पुढाकार घेतला होता. दरम्यान जड वाहतूक बंद करत तसा फलकही लावण्यात आला. हे नागरिकांच्या प्रस्तावित आंदोलनाचे यश म्हटले जाते.