अतिवृष्टी आणि विसर्गामुळे नुकसान, जिल्ह्यात ओला दुष्काळ घोषित करावा

मानवाधिकार संघटनेचे सरकारला निवेदन

गडचिरोली : जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या तीन दिवसांच्या अतिवृष्टीने आणि नंतर गोसेखुर्द धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे जिल्ह्यातील नद्यांना मोठा पूर येऊन शेती आणि घरांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ घोषित करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे यांनी दिली.

वैनगंगा, पोहार, गाढवी, पामुलगौतम, इंद्रावती, कठाणी, दिना, सती, पाल यांच्यासह जिल्हयातील सर्व नदी-नाल्यांना पूर येऊन आजुबाजूला नागरी वस्तीने राहणाऱ्या अनेक लोकांच्या घरां पाण्याचा वेढा पडला. सतत तीन ते चार दिवस ही स्थिती असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. याशिवाय शेतातील पीकही वाया गेले. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी, तसेच गडचिरोली जिल्ह्यात ओला दुष्काळ घोषित करावा, अशी मागणी प्रणय खुणे यांनी जिल्हाधिकारी संजय दैने यांना निवेदन देऊन करण्यात आली.

यावेळी संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ता ग्यानेंद्र विश्वास, मानवाधिकार संघटनेचे विदर्भ अध्यक्ष जावेद अली, जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना दहाडे, पुरुषोत्तम गोबाडे, जिल्हा महिला अध्यक्ष मनीषा मडावी यांच्यासह लक्ष्मी कन्नाके, तेजस्विनी भजे, मंजुषा आत्राम, शितल चिकराम तसेच भीमराव वनकर, स्वप्नील मडावी, देवानंद खुणे असे विविध तालुक्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही नावे यावेळी निवेदन देण्यात आले.