आरमोरी : रोजगार हमीच्या कामांसाठी ग्रामपंचायतींना साहित्य पुरवठा करणाऱ्यांची देयके तब्बल सात वर्षांपासून प्रलंबित आहेत. हा प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी काही पुरवठादारांनी आरमोरी पंचायत समितीसमोर उपोषण सुरू केल. त्या उपोषण मंडपाला आ.कृष्णा गजबे यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांसोबत चर्चा केली.

पुरवठादार संजय चरडुके, नरेंद्र पझाडे, विनोद खेवले, प्रकाश आकरे आणि इतरांनी यासंदर्भात एक निवेदन जिल्हाधिकारी आणि जि.प.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे. त्यात नमुद केल्यानुसार सदर पुरवठादारांनी 2017 मध्ये आरमोरी तालुक्यातील ग्राम पंचायतींना लागणारे साहित्य पुरविले होते. दरम्यान जिल्ह्यात न केलेल्या कामांच्या देयकांबाबतच्या तक्रारी आल्यानंतर सर्वच ठिकाणच्या कामांच्या देयकांची चौकशी सुरू झाली. त्यानुसार आरमोरी तालुक्यासाठी गठीत चौकशी समितीने वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याऐवजी समितीमधील काही अधिकाऱ्यांनी ग्राम पंचायतीच्या पुरवठाधारकांना व इतर सेवा पुरविणाऱ्यांना बोलवून पैशाची मागणी केली. ज्यांनी ती मागणी पूर्ण केली त्यांचा अहवाल सकारात्मक तर ज्यांनी पैसे देण्यास नकार दिला त्यांचा अहवाल नकारात्मक पाठविल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
याविषयी ग्रामपंचायतींना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी फेरचौकशीची मागणी केली. परंतू आतापर्यंत ती चौकशी कासवगतीने सुरू असल्याने ती पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे सर्वसाधारण स्थितीतील पुरवठाधारक आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे या पुरवठाधारकांनी अखेर उपोषण सुरू केले.

































