
गडचिरोली : जिल्ह्याचे सहपालकमंत्री अॅड.आशिष जयस्वाल यांनी बुधवारी (दि.24) आरमोरी तालुक्यातील हत्तींच्या त्रासाने पीडित गावांना भेटी देऊन शेतातही पाहणी केली. रानटी हत्तींच्या हल्ल्यांमुळे होत असलेल्या पिकांच्या नुकसानीवर आणि जीवितहानीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासन गांभीर्याने प्रयत्नशील आहे. हत्तींच्या हालचाली नियंत्रणात आणण्यासाठी त्यांना ट्रॅन्कुलाइज (इंजेक्शनने शांत करणे) करून दुसरीकडे वळविता येईल का, याचीही चाचपणी केली जाणार आहे. त्यासाठी डेहराडून येथील वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूटशी संपर्क साधला जाणार असल्याचे सांगत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीच्या रकमेत वाढ करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याचे संकेतही सहपालकमंत्री जयस्वाल यांनी यावेळी दिले.
या भेटीच्या वेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आमदार डॉ.मिलिंद नरोटे, उपवनसंरक्षक बी.वरुण प्रामुख्याने उपस्थित होते.
पिक नुकसानीची पाहणी व पंचनाम्यांचे निर्देश
सहपालकमंत्री जयस्वाल यांनी गडचिरोली तालुक्यातील चुरचुरा, पिपरटोला-धुडेशिवणी, दिभणा या गावांतील हत्तींमुळे झालेल्या पिक नुकसानीची पाहणी केली. ठाणेगाव येथे अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या 128 हेक्टर क्षेत्राची माहिती घेतली. यावेळी तात्काळ पंचनामे करून भरपाईचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
मृतकाच्या कुटुंबाला मदतीतून दिलासा
चुरचुरा येथे 10 सप्टेंबर रोजीच्या हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या वामन गेडाम यांच्या कुटुंबीयांना सहपालकमंत्री जयस्वाल यांच्या हस्ते 10 लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. त्यांना एकूण 25 लाख रुपयांची मदत जाहीर असून ती टप्प्याटप्प्याने दिली जाणार आहे.
तक्रारींच्या निवारणासाठी जनता दरबार घेणार
गावकऱ्यांशी संवाद साधताना नागरिकांनी हत्ती गावात येऊ नयेत, अशी उपाययोजना करण्याची मागणी तसेच नुकसानीची मदत मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी व विविध तक्रारी मांडल्या. यावर सहपालकमंत्री जयस्वाल यांनी वनविभागाने संवेदनशीलतेने बाधितांना वेळीच मदत द्यावी, तसेच शासन लवकरच 50 हजार रुपये प्रतिएकर मदतीचा निर्णय घेणार असल्याचे सांगितले. त्यांनी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने प्रत्येक तालुक्यात जनता दरबार घेऊन समस्या सोडविण्याची हमीही दिली.
मुख्यमंत्र्यांशी थेट संपर्क
पिपरटोला-धुडेशिवणी येथे ग्रामस्थांच्या उपस्थितीत सहपालकमंत्री जयस्वाल यांनी वाघ व हत्तींची समस्या, नुकसानभरपाईची कमी मिळणारी रक्कम, वनपट्टे, तसेच पांदण रस्ते या गंभीर प्रश्नांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला. यावर मुख्यमंत्र्यांनी लवकरच सकारात्मक निर्णय घेऊन जिल्हावासीयांना दिलासा दिला जाईल, असे आश्वासन दिले.
या पाहणीवेळी उपविभागीय अधिकारी रणजित यादव व अनुष्का शर्मा, अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन गावंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, तहसीलदार उषा चौधरी, तसेच राकेश बेलसरे, चंद्रशेखर भडांगे, प्रकाश ताकसांडे आदी उपस्थित होते.