Home पब्लिक प्रॉब्लेम वीज पुरवठा खंडीत झाल्याने माजी आमदार गजबेंची उपकेंद्रात धाव

वीज पुरवठा खंडीत झाल्याने माजी आमदार गजबेंची उपकेंद्रात धाव

वरिष्ठ अधिकाऱ्यांशी केली चर्चा

कुरखेडा : तालुक्यातील अंतरगाव येथील महावितरणच्या 33/11 kV (MSEB) उपकेंद्रातील 5 MVA क्षमतेच्या मुख्य सयंत्रात (ट्रान्सफॅार्मर) तांत्रिक बिघाड होऊन ते बंद पडले आहे. यामुळे काही दिवसांपासून संपूर्ण परिसरात गंभीर वीज समस्या निर्माण झाली असून, याचा थेट फटका शेतकरी आणि नागरिकांना बसत आहे. माजी आमदार कृष्णा गजबे यांनी याची गांभीर्याने दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी केली आहे.

सध्या उन्हाळी धान आणि मक्याचे पीक जोमात आहे. पिकांना पाण्याची नितांत गरज असतानाच वीज पुरवठा खंडित झाल्याने हाताशी आलेले पीक करपण्याची भीती व्यक्त होत आहे. यातून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी संतप्त नागरिकांनी माजी आमदार कृष्णा गजबे यांच्याकडे धाव घेतली आणि ही समस्या मांडली.

नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत गजबे यांनी तत्काळ अंतरगाव उपकेंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता मुरकुटे यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली. “शेतकऱ्यांचे नुकसान सहन केले जाणार नाही. बंद पडलेले 5 MVA चे सयंत्र युद्धपातळीवर दुरुस्त करा किंवा नवीन सयंत्र बसवून वीज पुरवठा सुरळीत करा,” अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष चांगदेव फाये, नगरसेवक व माजी नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे, सरपंच अशोक उसेंडी, शिक्षक मुरकुटे, एपीआय महेशकर यांच्यासह अंतरागाव परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.