आरमोरी : आरमोरी वनपरिक्षेत्रात दोन आठवड्यापूर्वी दोन महिलांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा संशय असताना मंगळवारी आणखी एक महिला श्वापदाच्या हल्ल्यात ठार झाली. तिच्यावर हल्ला करणारा तो बिबट्या असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. वनविभागाने त्याचा शोध घेण्यासाठी जंगलात ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. दरम्यान त्या हिंस्र श्वापदाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली असताना त्याकडे दुर्लक्ष केल्यानेच आणखी एका महिलेला बळी पडावे लागले, असा आरोप भाकप आणि शेकापने केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, कुंदा खुशाल मेश्राम (55 वर्ष) ही महिला मंगळवारी (दि.2) सकाळी 11 वाजताच्या सुमारास जंगलाला लागून असलेल्या आपल्या शेतशिवारात काम करण्यासाठी गेली होती. दुपारी 4 च्या सुमारास नातू किसन तिला आणायला गेला, पण ती शेतात दिसली नाही. त्यामुळे तो घरी येऊन आई व काही लोकांना घेऊन पुन्हा शेतात गेला, तेव्हा त्यांना शेतापासून काही अंतरावर तिचा मृतदेह दिसुन आला. कुंदा मेश्राम यांच्या पतीचे आधीच निधन झाले असून त्यांना एक मुलगा आणि तीन मुली आहेत.
हिंस्र श्वापदाने झडप घालून कुंदाबाईला ठार केले होते. याची माहिती मिळताच वडसाचे सहायक वनसंरक्षक सूर्यवंशी, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रविण बडोले यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यांनी त्या परिसरात मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी जनजागृती करून गावकऱ्यांना सावध राहण्याच्या सूचना केल्या. तसेच वनकर्मचाऱ्यांची गस्तही वाढविण्यात आली. सुरक्षेच्या दृष्टिने जंगल परिसरात कुणीही विनाकारण जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले.
































