गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात लागू केलेली दारुबंदी पूर्णपणे फसली. या बंदीमुळे लोक विषारी दारूचे सेवन करत आहेत. त्यातून लोकांचे आरोग्य बिघडत आहे. त्यामुळे या जिल्ह्यासाठी दारूबंदी फायद्याची आहे की तोट्याची, याची नव्याने समिक्षा करण्याची गरज आहे. त्यासाठी तत्काळ उच्चस्तरीय समिती नेमणे गरजेचे आहे. चंद्रपूर जिल्ह्यात फसलेल्या दारूबंदीची समिक्षा करण्यासाठी समिती नेमली होती, मग गडचिरोलीकरीता का नाही? दोन जिल्ह्यात असा भेदभाव का? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या डॅाक्टर सेलचे सरचिटणीस डॅा.प्रमोद साळवे यांनी उपस्थित केला आहे.
गांधी जिल्हा म्हणून वर्धा जिल्हा सोडल्यास संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही दारुबंदी नाही. परंतु गडचिरोली जिल्ह्यात मुठभर मठाधिशांच्या फायद्यासाठी दारुबंदी सुरु आहे की काय, अशी शंका येत असल्याचे डॅा.साळवे यांनी म्हटले आहे. शासनातर्फे गडचिरोली जिल्हयात दारुबंदी असली तरीही गावोगावी हातभट्टीची दारु विकी सुरु आहे. त्यामुळे अनेक लोकांचे संसार उघडयावर पडत आहेत. सोबत शासनाचाही कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे.
चोरून लपून विक्री केल्या जात असलेल्या दारूमुळे त्याचे आकर्षण जास्त वाढले आहे. परिणामी गावातील तरुण, शाळकरी मुलेही दारुच्या व्यसनाच्या आहारी जात असून त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. परंतु समाजमन व कोणाच्या आरोग्याचा विचार न करता फक्त काही लोकांच्या हव्यासापोटी, त्यांच्या हट्टापोटी जिल्हयात दारुबंदी सुरु आहे. पण लगतच्या जिल्ह्यांमध्ये चारूही बाजुने दारूची आयात होण्यासाठी मार्ग असल्यामुळे दारूबंदीची अंमलबजावणी करणे शक्य नाही. अधिकृतपणे दारू विक्री होत नसल्यामुळेच दर्जाहीन आणि नकली दारू विक्री होण्यासाठी वाव मिळत असल्याचा आरोप डॅा.साळवे यांनी केला आहे.
अधोगतीकडे नेण्याचे षडयंत्र तर नाही?
गावोगावी हातभट्टा चालविल्या जातात. त्यामार्फत तरुण पिढीला वाममार्गाने व्यसनाधिन करुन त्यांना अधोगतीकडे नेण्यासाठी हे शास्रशुध्द षडयंत्र तर नाही? याची चौकशी होणे आवश्यक आहे. याकरीता शासनाने त्वरित चंद्रपूर जिल्हयाप्रमाणे येथील जनमाणसाच्या मनाचा ठाव घेऊन विषारी दारुमुळे झालेले मृत्यु, तसेच शासनाचा बुडालेला महसूल, दारुबंदीमुळे खरेच दारुबंदी झाली काय? दारुबंदीच्या आधी गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारुविक्रीचे किती गुन्हे नोंदवल्या गेलेत? दारुबंदी झाल्यानंतर आतापर्यंत दरवर्षी किती गुन्हे नोंदविल्या गेले, याची चौकशी करुन ही फसवी दारूबंदी उठवावी, अशी मागणी डॅा.साळवे यांनी केली आहे.