गडचिरोली : इराण-इस्रायल युद्धाचा भडका उडाल्यानंतर आधी गॅस सिलिंडर मिळण्यासाठी नागरिकांनी एजन्सींच्या कार्यालयापुढे रांगा लावल्या होत्या. आता गेल्या दोन दिवसांपासून शहरातील पेट्रोल पंपांवर सकाळपासून रात्री उशिरापर्यंत पेट्रोल भरण्यासाठी वाहनधारकांच्या रांगा लागत आहेत. पेट्रोलची टंचाई निर्माण होऊन पेट्रोल मिळणार नाही, अशी भिती नागरिकांमध्ये आहे. शहरातील अर्ध्यापेक्षा जास्त पेट्रोल पंप बंद आहेत. त्यातून ही भिती निर्माण झाली आहे. मात्र प्रत्यक्षात पेट्रोल पंप बंद असण्यामागे पेट्रोलची टंचाई हे कारण नसून दुसरेच कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गडचिरोली शहरात आणि शहरालगत सर्व कंपन्यांचे मिळून 10 पेट्रोल पंप आहेत. त्यातील सर्वाधिक 5 पंप चंद्रपूर मार्गावर आहेत. पण त्या 5 पैकी 3 पंप दोन दिवसांपासून बंद आहेत. चामोर्शी आणि आरमोरी मार्गावरील पंपही सोमवारी संध्याकाळपर्यंत बंदच होते. धानोरा मार्गावरील एक आणि चंद्रपूर मार्गावरील दोन असे तीनच पंप सुरू असल्याने वाहनधारक आपल्या वाहनांमध्ये पेट्रोल भरून घेण्यासाठी सकाळपासून पंपांवर रांगा लावत आहेत.
अर्ध्याहून अधिक पंप बंद असल्याने खरे कारण जाणून न घेता, हा युद्धाचा परिणाम असल्याची अनेकांची धारणा झाली आहे. त्यामुळे पेट्रोल पंपावरच्या रांगेत तासभर प्रतीक्षा करून अनेक वाहधारक टाकीभर पेट्रोल टाकण्यासाठी आग्रह धरत आहेत. यासंदर्भात बंद असलेल्या पेट्रोल पंप व्यवस्थापकांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी खरे कारण सांगितले.
कंपन्यांकडून पेट्रोल मिळत नसल्याने पंप बंद आहे हे खरे आहे, मात्र पेट्रोल न मिळण्यामागे पेट्रोलची टंचाई हे कारण नाही. आता सर्व कंपन्यांनी पंपचालकांकडून टँकरचे पूर्ण पैसे भरल्याशिवाय बुकिंग करणे बंद केले आहे. त्यामुळे पेट्रोल न मिळण्यामागे खरे कारण हे असल्याचे त्यांनी सांगितले. काही पंपचालकांनी कंपनीकडे पैसे भरण्याची व्यवस्था केली असून दोन ते तीन दिवसांत बहुतांश पेट्रोल पंप सुरळीत सुरू होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.
































