गडचिरोली : राज्याच्या पूर्व टोकावरील दुर्गम गडचिरोली जिल्ह्याला चांगल्या आरोग्य सेवेसाठी नागपूर, चंद्रपूरवर विसंबून राहावे लागत होते. परंतू आता गडचिरोलीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखविल्यामुळे गडचिरोली जिल्हा आरोग्य सेवेच्या बाबतीत परिपूर्ण होईल, असा विश्वास खासदार अशोक नेते यांनी व्यक्त केला. सदर वैद्यकीय महाविद्यालयासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना तज्ज्ञ डॅाक्टरांची वैद्यकीय सेवा मिळाली, त्यासाठी नागपूर किंवा चंद्रपूरला जाण्याची गरज पडू नये म्हणून गडचिरोलीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यासाठी खासदार अशोक नेते अनेक वर्षांपासून पाठपुरावा करीत होते. गडचिरोली विधानसभेचे आमदार असतानापासून त्यांनी ही मागणी लावून धरली होती. परंतू मेडिकल कॅालेजसाठी आवश्यक असणाऱ्या भौतिक सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे त्यासाठी विलंब लागत होता. अखेर यावर्षीच्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने गडचिरोलीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देण्याचे जाहीर केले. त्यानंतर बुधवारी (दि.२८) मंत्रिमंडळाने प्रत्येकी १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे ९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास मंजुरी देऊन त्यासाठी निधीची तरतूद केली. त्यात गडचिरोलीचाही समावेश करण्यात आला आहे.
निधीची तरतूद केल्याने आता वैद्यकीय महाविद्यालयासाठी लागणाऱ्या भौतिक सुविधा आणि मनुष्यबळाची पूर्तता करण्याच्या कामाला वेग येणार आहे. मेडिकल काँसिल आॅफ इंडिया (एमसीआय) कडून मान्यता मिळताच पुढील सत्रात गडचिरोलीत वैद्यकीय अभ्यासक्रमाचे वर्गही सुरू होण्याची शक्यता खा.अशोक नेते यांनी व्यक्त केली. जिल्हावासियांना चांगली आरोग्य सेवा मिळण्यासोबत स्थानिक युवक-युवतींना वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळण्याची संधीही यामुळे मिळू शकते, असे खा.नेते म्हणाले.