गडचिरोली : जिल्ह्यातील चिचडोह जमीन अधिग्रहण, राजीव उपसा सिंचन योजना, वसा-पोर्ला उपसा सिंचन योजना, रेगडी जलाशयाच्या कालव्याची दुरुस्ती, पीडीएनद्वारे गोगाव उपसा सिंचन योजना, रेगडी जलशयातून नवीन सिंचन योजना आणि बंद पडलेल्या अनखोडा उपसा सिंचन योजना यासारख्या योजनांना मंजुरी व विविध समस्या सोडवण्यासाठी दि.22 मे रोजी नागपूर येथे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे संचालक व अभियंत्यांसोबत बैठकीचे आयोजन केले होते.
यावेळी गडचिरोली विधानसभा क्षेत्रात अनेक सिंचन प्रकल्पांना मंजुरी मिळाली असून त्यांना निधी उपलब्ध करून काम सुरू करण्याची आवश्यकता, तसेच चिचडोह बॅरेज सिंचन प्रकल्पात शेतजमीन गेलेल्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊन जमिनीचे अधिग्रहण करावे, अशी सूचना आ.डॉ. देवराव होळी यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना केली.
या बैठकीला विदर्भ पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक सोनटक्के, मुख्य अभियंता पवार, अधीक्षक अभियंता पाटील, कार्यकारी अभियंता झोड, सहाय्यक अभियंता मेश्राम, भाजपचे पदाधिकारी दिलीप चलाख, राजू धोडरे, निखिल धोडरे, शेतकरी देवनाथ बोधलकर, प्रकाश गव्हारे, देवाजी जुवारे, सतीश भांडेकर, अशोक धोडरे, प्रदीप साखरे, गणेश लटारे उपस्थित होते.
चिचडोह सिंचन प्रकल्प सुरू होऊन बराच कालावधी झाला, मात्र त्याच्या बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या जमिनीचे अधिग्रहण अजूनपर्यंत झालेले नाही. त्या शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला तातडीने देवून जमिनींचे अधिग्रहण करून द्यावे, अशी मागणी आ.होळी यांनी केली. याशिवाय शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणारे सिंचन प्रकल्प लवकर मार्गी लागावे, अशीही सूचना त्यांनी केली.
चामोर्शी तालुक्यातील राजीव उपसा सिंचन योजना भेंडाळा, वसा-पोर्ला उपसा सिंचन योजना, रेगडी कन्नमवार जलाशयाचे पाणी टेल (शेवट)पर्यंत पोहोचत नसल्याने कालव्याची दुरुस्ती करणे, पीडीएनद्वारे पाणीपुरवठा करून गोगाव उपसा सिंचन योजना कार्यान्वित करणे, रेगडी जलशयातून नवीन उपसा सिंचन योजना सुरू करणे, बंद पडलेली अनखोडा सिंचन योजना सुरू करून पीडीएनद्वारे शेतीला पाणीपुरवठा करणे या सिंचन प्रकल्पांना आवश्यक असणाऱ्या मंजुरी देऊन त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी सूचना यावेळी डॅा.देवराव होळी यांनी अधिकाऱ्यांकडे केली.