चिरचाडी, लक्ष्मीपूर गावाला चक्रीवादळाचा फटका, राहत्या घरांवरील छतांचे नुकसान

नुकसानग्रस्त घरांना आ.गजबे यांची भेट

कुरखेडा : तालुक्यातील चिरचाडी, लक्ष्मीपूर येथे 21 मे रोजी आलेल्या जोरदार पाऊस आणि चक्रीवादळामुळे चिरचाडी गावातील काही घरांवर झाडे पडून मोठ्या प्रमाणात घरांची हाणी झाली. लगतच्या परिसरात वीज पुरवठा खंडित होण्याबरोबर चक्रीवादळाने घरांचे छत उडून जाऊन झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. या घटनेची माहिती मिळताच आ.कृष्णा गजबे यांनी चिरचाडी व लक्ष्मीपूर या गावी जाऊन नुकसानग्रस्त कुटूंबियांची भेट घेऊन घरांची पाहणी केली आणि पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले.

चिरचाडी व लक्ष्मीपूर येथील लखंदास श्यामराव करपते, मोरेश्वर श्रीराम उईके, शशिकला सुखदेव कावसे यांच्या घरांवरचे छप्पर चक्रीवादळाने उडाले. काही घरांवर झाडे पडून राहत्या घराचे आणि घरगुती सामानाचेही नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

गावांना भेटी देताना भाजपचे तालुका अध्यक्ष चांगदेव फाये, रविंद्र गोटेफोडे व गावातील प्रतिष्ठित नागरिक खेमनाथ पाटील डोंगरवार, ग्रामसेवक गेडाम तथा गावातील नागरिक उपस्थित होते.