रेल्वेमार्गाचे काम जलदगतीने करण्यासह बंद रेल्वेगाड्या चालू करण्याची मागणी

खा.डॉ.किरसान संसद सभागृहात बोलले

गडचिरोली : वडसा ते गडचिरोली या रेल्वेमार्गाच्या कामाला गती देण्यासह कोरोनाकाळापासून बंद असलेल्या काही रेल्वेगाड्या पुन्हा सुरू करण्याची मागणी खा.डॅा.नामदेव किरसान यांनी बुधवारी संसद सभागृहात केली.

अनेक वर्षांपासून रेंगाळत असलेल्या वडसा-गडचिरोली या रेल्वेमा्र्गाचे काम दोन वर्षांपूर्वी सुरू झाले. टप्पेनिहाय वेगवेगळ्या कंत्राटदाराना हे काम देण्यात आले. पण प्रत्यक्षात हे काम संथगतीने सुरु असल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे डॅा.किरसान म्हणाले. तसेच कोरोना काळापासून बलारशहा-वडसा -गोंदिया मार्गावरील काही रेल्वेगाड्या बंद आहेत, त्यामुळे या मार्गांवर आवागमन करणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दुसरीकडे सिरोंचा, अहेरी भागातील रस्ते खराब असल्याने व नागपूरचा प्रवास या मार्गाने लांब होत असल्याने या भागातील नागरिक काजीपेठमार्गे काजीपेठ-अजनी पॅसेंजर ट्रेनने नागपूरपर्यंतचा प्रवास करीत होते. मात्र ती रेल्वेगाडीसुद्धा कोरोना काळात बंद आहे. त्यामुळे अहेरी-सिरोंचा परिसरातील नागरिकांना प्रवासासाठी त्रास होत आहे. वडसा ते चांदाफोर्ट, चांदाफोर्ट ते गोंदिया, गोंदिया ते रायपूर, काझीपेठ ते अजनी (नागपूर) या गाड्या कोरोनाकाळापासून बंद आहेत, त्या पूर्ववत सुरु करण्यात याव्या, तसेच गडचिरोली-वडसा, नागभीड -नागपूर रेल्वेमार्गाच्या कामाला गती द्यावी अशी मागणी त्यांनी केली.

याशिवाय वडसा स्थानकाजवळ आणि इतर ठिकाणी रेल्वेने तयार केलेल्या भुयारी मार्गात पावसाळ्यात पाणी साचते. त्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी डॅा.किरसान यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली.