सिरोंचा : गेल्या चार वर्षांपासून दैनावस्था झालेल्या आलापल्ली ते सिरोंचा मार्गावर प्रवास म्हणजे अपघाताला आमंत्रण देणे ठरत होते. राष्ट्रीय महामार्ग क्र.एनएच-३५३ मध्ये येणाऱ्या या मार्गाची पुनर्बांधणी करण्याचे काम वनकायद्याच्या अडचणीत अडकले होते. या बहुप्रतीक्षित मार्गावरील ही अडचण टप्प्याटप्प्याने दूर होत आहे. सिरोंचा ते रेपनपल्ली या ५९ किलोमीटर मार्गाच्या पुनर्बांधणीतील अडथळे दूर झाल्याने शुक्रवार ५ मे रोजी या कामाची सुरूवात खासदार अशोक नेते यांच्या हस्ते भूमिपूजन करून करण्यात आली.
या भूमिपूजन समारंभाला भाजपचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुराव कोहळे,नवनिर्वाचित विशेष प्रदेश सदस्य रविंद्र ओल्लालवार,जिल्हा उपाध्यक्ष दामोधर अरिगेलवार, जिल्हा उपाध्यक्ष विनोद आकंपलीवार,जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत शुगरवार, तालुकाध्यक्ष शंकर नरहरी, तहसीलदार जितेंद्र शिकतोडे, डेप्युटी इंजिनिअर नितीन बोबडे, सारंग गोगटे, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष राजेश संतोषवार, तालुका महामंत्री माधव कासर्लावार, जिल्हा सचिव संदीप राचर्लावार,मन कि बातचे संयोजक तथा जिल्हा उपाध्यक्ष सतीश पाळमटेंटी, शहराध्यक्ष सितापती गट्टू,ओबिसी आघाडीचे तालुका अध्यक्ष रमेश मुंगीवार,ओबिसी आघाडीचे उपाध्यक्ष नागेश ताडबोईना, तसेच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण झाल्याने जवळपास ४३० गावांचा संपर्क जिल्हा मुख्यालयाशी जुळणार आहे. त्यामुळे हे काम दर्जेदार आणि लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना खासदार अशोक नेते यांनी संबंधित कंत्राटदार व अभियंत्यांना दिली.गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात १५ हजार कोटींची राष्ट्रीय महामार्गाची कामे आपण खेचून आणली असून वनकायद्याच्या अडचणीमुळे रखडलेली कामेही आता मार्गी लागत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.












