घरकुल लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ करा, राकाँ (शप) पक्षाची मागणी

ऋतुजा कन्नाके यांनी दिले निवेदन

गडचिरोली : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शासनातर्फे घरकुल योजनेचा लाभ देण्यात येत आहे, मात्र त्यासाठी मिळणारे अनुदान अतिशय तुटपुंजे आहे. आताच्या परिस्थितीत घर बांधकामाच्या साहित्यात मोठी दरवाढ झालेली आहे. दिलेल्या अनुदानात बांधकाम करणे कठीण झाले आहे. त्यामुळे घरकुलाच्या अनुदानात वाढ करावी, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने करण्यात आली. जिल्हा चिटणीस ऋतुजा कन्नाके यांच्या नेतृत्वात यासंदर्भात जिल्हाधिकारी संजय दैने यांना निवेदन देण्यात आले.

शासनाने घरकुल योजनेतअंतर्गत दिला जाणारा लाभ हा महागाईनुसार ठरवून त्यात वाढ करण्यात यावी, तसेच मागील वर्षीचे घरकुलाचे अनुदान लाभार्थ्यांना मिळाले नसून, लाभार्थी अडचणीत आले आहेत. त्या अनुदानाची रक्कम तात्काळ देऊन बांधकामासाठी लागणारी वाळू सुद्धा वाढवून द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

हे निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावे देण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विमल भोयर, जिल्हा सरचिटणीस सुषमा येवले, गडचिरोली शहराध्यक्ष प्रीती कोवे, शहर उपाध्यक्ष नईमा हुसेन, शहर सरचिटणीस मीना मावळणकर, मंजुषा लांबट, सुनिता सेलोकर, खुशबू रामटेके, अश्विनी भसारकर आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.