गडचिरोली : जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी राज्य शासनाने आपल्या अर्थसंकल्पात मोठा निधी मंजूर करत जिल्ह्याच्या विकासाचा नवा अध्याय सुरू केला आहे. त्यात गडचिरोलीकरांची सर्वात मोठी उणीव दूर करणाऱ्या सुसज्ज प्रेक्षागृहाचाही (ऑडिटोरियम) समावेश आहे. 27 कोटी 59 लाख रुपये खर्च करून उभारले जाणारे हे सुसज्ज प्रेक्षागृह नाट्यरसिकांसह विविध समारंभांसाठी महत्वाचे ठरणार आहे. (अधिक वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा)
झाडीपट्टी रंगभूमी म्हणून संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेल्या नाटकांचे गडचिरोली जिल्हा (वडसा) हे माहेरघर आहे. आतापर्यंत हजारावर नाटकांची निर्मिती या जिल्ह्यात झाली. पण जिल्हाभरात एकही सुसज्ज नाट्यगृह नसणे ही सर्वांची खंत होती. पण गडचिरोलीत होणार असलेल्या प्रेक्षागृहामुळे ती उणीव भरून निघणार आहे.
तब्बल 750 आसन क्षमतेचे हे प्रेक्षागृह नाटकांच्या सादरीकरणासह विविध समारंभांसाठी उपयोगाचे ठरणार आहे. शालेय विद्यार्थी, रंगकर्मी आणि झाडीपट्टीच्या कलाकारांसाठी हे प्रेक्षागृह एक हक्काचे व्यासपीठ ठरणार आहे.
विश्रामगृहांसह जिल्हाधिकारी कार्यालयाचे विस्तारीकरण
गडचिरोलीत महत्वाच्या व्यक्तींच्या भेटी सतत होत असल्यामुळे आणि त्यासाठी कॉम्प्लेक्स येथील विश्रामगृह अपुरे पडत असल्याचे सांगत शासनाने 12.83 कोटी रुपये खर्चून नवीन व्ही.व्ही.आय.पी. विश्रामगृह उभारणीस मंजुरी दिली आहे. तसेच इंदिरा गांधी चौकातील 157 वर्षे जुन्या विश्रामगृहाच्या पुनर्बांधणीसाठी 5.25 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. लोकप्रतिनिधी व इतर मान्यवरांसाठी हे अद्ययावत विश्रामगृह उपयुक्त ठरणार आहे. याशिवाय महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी विश्रामगृहाची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. त्यांच्या मागणीनुसार 9.95 कोटी रुपये खर्चून महसुल विभागासाठी नवीन विश्रामगृह उभारले जाणार आहे.
गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती 1982 मध्ये झाल्यानंतर उभारलेले जिल्हाधिकारी कार्यालय 43 वर्षे जुने आहे. प्रशासकीय कामकाज अधिक गतीमान व्हावे यासाठी 24.56 कोटी रुपये खर्चून जिल्हाधिकारी कार्यालयाचे विस्तारीकरण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.