दोन वर्षांच्या पाठपुराव्यानंतर गट्टा-कोठी रस्ता व पूल मंजूर

लवकरच होणार कामाला सुरुवात

एटापल्ली : तालुक्यातील गट्टा गाव ते भामरागड तालुक्यातील कोठी गाव या दरम्यान नवीन डांबरी रस्ता व पूल बांधकाम करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. एटापल्ली सा.बां.उपविभागाचे उपविभागीय अभियंता यांनी लेखी पत्राद्वारे यासंदर्भातील माहिती भाकपचे जिल्हा सहसचिव सचिन मोतकुरवार यांना दिली. निविदा प्रक्रिया सुरू असून लवकरच कार्यारंभ पत्र देऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. (अधिक बातमी खाली वाचा)

गट्टा व कोठी या गावांमध्ये रोटी-बेटीचे नाते असल्याने या मार्गाने दोन्ही तालुक्यातील नागरिकांची सतत ये-जा सुरू असते. बाजार, व्यापार, शिक्षण तसेच शासकीय कामकाजासाठी या मार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मात्र या मार्गावर योग्य डांबरी रस्ता व पूल नसल्याने नागरिकांना दीर्घकाळापासून प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत होता. पावसाळ्यात या मार्गाने प्रवास करणे अतिशय कठीण होत असे.

या मार्गावर पूल आणि चांगला रस्ता बनविण्याच्या मागणीसाठी भारतीय कॅाम्युनिस्ट पक्षाच्या वतीने 2 वर्षांपासून पाठपुरावा केला जात होता. विविध स्तरांवर निवेदने देऊन व आंदोलने करून हा मुद्दा वारंवार उपस्थित करण्यात आला. अखेर प्रशासनाने या मागणीची दखल घेतली.