Home पब्लिक प्रॉब्लेम गॅस सिलिंडरची टंचाई नसताना अनावश्यक साठेबाजी करू नका

गॅस सिलिंडरची टंचाई नसताना अनावश्यक साठेबाजी करू नका

सहपालकमंत्री जयस्वाल यांचे आवाहन

गडचिरोली : इराण–इस्राईल युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलिंडरबाबत समाजमाध्यमांवर पसरणाऱ्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. जिल्ह्यात घरगुती एलपीजी गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारची घाबराट न बाळगता अनावश्यक साठेबाजी करू नये, असे आवाहन जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी केले आहे.

सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिलेल्या संदेशात म्हटले आहे की, जिल्ह्यातील सर्व गॅस वितरकांकडे घरगुती एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. नागरिकांना नियमितपणे गॅस सिलिंडरचा पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे गॅस तुटवड्याच्या अफवा पसरविणे अथवा त्यावर विश्वास ठेवणे टाळावे.

जिल्हा प्रशासनाने गॅस सिलिंडरचा काळाबाजार, अवैध साठवणूक आणि गैरवापर रोखण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. विविध तालुक्यांमध्ये पथके नियुक्त करून तपासण्या सुरू असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांच्या हितासाठी प्रशासन सतर्क असून गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

नागरिकांनी आवश्यक तेवढाच गॅस वापरावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सहपालकमंत्री ॲड.जयस्वाल यांनी केले आहे.