Home पब्लिक प्रॉब्लेम जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल मुबलक; जिल्हा प्रशासनाचे स्पष्टीकरण

जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल मुबलक; जिल्हा प्रशासनाचे स्पष्टीकरण

अफवांवर विश्वास ठेवू नका

गडचिरोली : मध्यपूर्व आशिया, अमेरिका व युरोपियन खंडात सुरू असलेल्या युद्धाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठ्याबाबत खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील पेट्रोल, डिझेल तसेच एल.पी.जी. गॅस साठ्याचा आढावा घेतला आहे. संबंधित तेल कंपन्यांनी जिल्ह्यात पुरेसा इंधनसाठा उपलब्ध असल्याचे कळविले असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.

जिल्ह्यात कार्यरत असलेल्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड, तसेच रिलायन्स पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपन्यांकडून पेट्रोल, डिझेल, स्नेहक तसेच एल.पी.जी. गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती प्रशासनाला दिली आहे.

जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच संबंधित तेल कंपन्यांच्या समन्वयातून जिल्ह्यातील पेट्रोल व डिझेल साठ्यावर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे. जिल्ह्यात इंधनाचा कोणताही तुटवडा नसून नागरिकांनी पेट्रोल पंपावर अनावश्यक गर्दी करू नये, असे जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी कळविले आहे.