आरक्षणात बदल करून नव्याने पदभरतीची जाहीरात काढा

राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांची सूचना

हंसराज अहीर यांचा सत्कार करताना ओबीसी शिष्टमंडळाचे पदाधिकारी, सोबत खासदार अशोक नेते.

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात पेसा क्षेत्रात तलाठी व वनरक्षक पद भरतीमध्ये ओबीसीसहित इतर गैरआदिवासी समाजासाठी एकही जागा आरक्षित नसल्यामुळे त्यांच्यावर हा अन्याय आहे. त्यामुळे या पदभरतीला मुख्यमंत्र्यांनी तातडीने स्थगिती देऊन 28 फेब्रुवारी 2023 च्या शासन निर्णयानुसार आरक्षण निश्चित करून नव्याने जाहीरात प्रसिद्ध करावी, अशी सूचना राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी केली.

येथील विश्राम भवनावर दि.5 ला ओबीसी संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत पदभरतीच्या अन्यायकारक जाहीरातीसंदर्भात लोकप्रतिनिधी आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी अहीर यांना अवगत केले. जाहीरात जुन्या शासन आदेशानुसार काढण्यात आल्याचे लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी वरीलप्रमाणे सूचना केली. यासंदर्भात राज्य शासनाची सुनावणी लावणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी खासदार अशोक नेते, आ.डॅा.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, ओबीसी संघटनांचे समन्वयक प्रा.शेषराव येलेकर, ओबीसी समन्वयक तथा भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, प्रशांत वाघरे, प्रदेश चिटणीस रेखा डोळस, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष सुनील पारधी, ज्येष्ठ नेते रमेश भुरसे, मोतीलाल कुकरेजा तथा ओबीसी समाजाचे शिष्टमंडळ उपस्थित होते.

यावेळी हंसराज अहीर यांचा ओबीसी संघटनांच्या वतीने शाल-पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या चर्चेच्या वेळी प्रा. रमेश बारसागडे, भास्कर बुरे, आशिष पिपरे, सुनील पारधी यांनीसुद्धा ओबीसींवर होणाऱ्या अन्यायाविषयी आपले मत व्यक्त केले. बैठकीला दादाजी चुधरी, काँग्रेसचे सतीश विधाते, प्रभाकर वासेकर, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्याध्यक्ष विनायक बांदुरकर, उपाध्यक्ष पांडुरंग घोटेकर, सचिव प्रा.देवानंद कामडी, कोषाध्यक्ष डॉ.सुरेश लडके, संघटक सुरेश भांडेकर, चंद्रकांत शिवणकर, जिल्हा युवा उपाध्यक्ष राहुल भांडेकर, महिला अध्यक्ष संगीता नवघडे, संघटक ऐश्वर्या लाकडे, सुधाकर दुधबावरे, दादाजी चापले, विलास भांडेकर, बंडू झाडे, संगीता रेवतकर, मारुती दुधबावरे, विजय वैरागडे आदी उपस्थित होते.