मार्कंडा यात्रेदरम्यान यावर्षी प्रथमच यात्रेसाठी रात्री एक तास वाढवून दिली वेळ

खा.अशोक नेते यांनी केली होती सूचना

गडचिरोली : जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळख असलेल्या विदर्भाची काशी मार्कंडेश्वर देवस्थान येथे यावर्षीही यात्रेसाठी मोठी गर्दी झाली होती. जवळपास आठवडाभर चाललेलेल्या या यात्रेसाठी पहिल्यांदाच नियोजन वेळेपेक्षा रात्री एक तास उशिरापर्यंत दुकाने सुरू ठेवण्यात आल्यामुळे छोट्या दुकानदारांना अधिक लाभ होण्यासोबत यात्रेकरूंचीही सोय झाली. ही वेळ वाढवून द्यावी, अशी सूचना खासदार अशोक नेते यांनी पोलिस अधीक्षकांना केली होती.

दरवर्षी महाशिवरात्रीला लाखो भाविक मार्कंडेश्वर मंदिरात शिवमंदिरात पुजनासाठी गर्दी करत असतात.दरवर्षी मोठ्या उत्साहात, आनंदात ही यात्रा भरते. परंतु गृह विभागाच्या आदेशान्वये यात्रा फक्त रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत होती. यासंदर्भात दुकानदार, हॉटेल, खानावळ चालक, झुले चालक आणि इतर छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती. यासंदर्भात भाजपचे सहकार प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे आणि सोशल मिडिया प्रमुख रमेश अधिकारी यांनी ही बाब खा.अशोक नेते यांना सांगितल्यानंतर त्यांनी लगेच या संदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षकांशी भ्रमणध्वनीवर चर्चा करून त्यांना यात्रेची वेळ एक तासाने वाढवून द्यावी अशी सूचना केली. त्यानुसार रात्री एक तास वाढवून देण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विलास बल्लमवार व मार्कंडा देवस्थान यात्रेतील व्यापारी, असोशिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.