गडचिरोली : देसाईगंज तालुक्यातील कुरुड, कोंढाळा परिसरात उद्योगपती जिंदल यांच्याकडून स्टिपचा कारखाना सुरू केला जाणार आहे. परंतु या कारखान्याला या भागातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. जर शेतकऱ्यांची शेती कंपनीला गेली तर आपण जगायचे कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे एक हजारावर शेतकऱ्यांच्या सह्या असलेले निवेदन माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. (सविस्तर बातमी खाली वाचा)

या कारखान्याला तालुक्यातील कोंढाळा, कुरुड, शिवराजपूर, तुळशी, कोकडी, नैनपूर या गावातील जमिनीसह शेतीची आवश्यकता भासणार आहे. या सर्व गावातील 5690.9 एकर शेती जिंदल कंपनीला देण्याकरिता जिल्हाधिकारीस्तरावर हस्तांतरणाची प्रक्रिया शेवटच्या स्तरावर सुरू आहे. या भागातील शेतकऱ्यांना आपली जमीन जिंदाल कंपनीला जाणार आहे याची माहिती नाही. या भागातील पेसाअंतर्गत ग्रामपंचायत किंवा नॅानपेसा ग्रामपंचायतींचा ठराव सुद्धा शासन स्तरावर किंवा जिंदल कंपनीकडून मागवण्यात आला नाही.
ही हस्तांतरण प्रक्रिया शासनाकडून जबरदस्तीने सुरू आहे. या भागातील शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचे शेतीच्या आधारावरच पालनपोषण होते. या शेतीच्या उत्पन्नाच्या भरोशावर मुला-मुलींचे शिक्षण, लग्न, आर्थिक व्यवहार करण्यात येतात. पारंपरिकपणे कसत असलेली शेती तुटपुंजा पैशाने शासन खरेदी करणार. या व्यवहारात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. या भागातील शेतकऱ्यांची जमीन जिंदाल कंपनीला देण्यात येऊ नये, याकरिता माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले.
माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या सूचनेनुसार तालुकाध्यक्ष सुनील पारधी यांनी निवेदन तयार करून शेतकऱ्यांच्या सह्या घेतल्या. त्यानंतर तात्काळ जिल्हा मुख्यालयी शिष्टमंडळासोबत जाऊन त्यांनी मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांची बाजू समजावून सांगितली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकल्पासाठी सुपीक जमिनी कोणत्याही परिस्थितीत देणार नाही, पर्यायी जागा शोधण्यात येईल, असे आश्वासन दिले.
यावेळी प्रामुख्याने तालुका अध्यक्ष सुनील पारधी, जिल्हा उपाध्यक्ष राजू जेठानी, नरेश विठ्ठलानी, शंकर पारधी, ग्रामपंचायत सदस्य कुरुड अरुण राऊत, माजी ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते रोशन ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते.

































