गडचिरोली : शासनाच्या आधारभूत किमतीनुसार दरवर्षी शेतकऱ्यांकडील धानाची खरेदी करणाऱ्या संस्थांना मिळणारे कमिशन वाढवून देण्यासाठी तसेच साठवणुकीनंतर भरडाईसाठीसाठी देताना केवळ ०.५०० ग्रॅम घटीची मर्यादा वाढवून देण्यासाठी केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांची भेट घेण्याची ग्वाही खासदार अशोक नेते यांनी या संस्थांच्या प्रतिनिधींना दिली.
गडचिरोलीसह चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची या विषयावर मंगळवारी आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बैठक आयोजित केली होती. यावेळी खासदार अशोक नेते यांच्यासह आमदार कृष्णा गजबे, आरमोरी बाजार समितीचे सभापती ई.ध.पासेवार, उपसभापती व्य.ल.नागिलवार, संचालकगण, तसेच गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील विविध कार्यकारी संस्थांचे अध्यक्ष, संचालकगण प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी तीनही जिल्ह्यातील संस्थांच्या प्रतिनिधींनी धान खरेदीसाठी हंगाम २०२२-२३ नुसार मिळत असलेले प्रतिक्विंटल ३१.२५ वरून २०.४० रुपये केलेले कमिशन तसेच अनुषंगिक खर्चाच्या परिपत्रकानुसार ०.५०० ग्रॅम घट आम्हाला मान्य नसल्याचे सांगत त्यात वाढ करण्याची मागणी केली. हा विषय केंद्र सरकारच्या कक्षेतील असल्यामुळे त्यासंदर्भात केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन त्यांना हा विषय समजावून सांगणार असल्याचे यावेळी खा.नेते यांनी सांगितले.