अहेरी : येथील युवक सचिन नागुलवार याचा मंगळवारी रात्री सुरजागडमधील लोहखनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रान्सपोर्ट कंपनीच्या ट्रकवर धडकून मृत्यू झाला. एटापल्ली मार्गावरील येलचिल येथे झालेल्या या अपघातात दुचाकीवर मागे बसलेला दुसरा एक युवक गंभीर जखमी झाला. या अपघातानंतर विविध मागण्यांसाठी नागुलवार कुटूंबियांनी मृतदेह घेऊन अहेरीतील आझाद चौकात मध्यरात्री ठिय्या आंदोलन केले. लॅायड्स मेटल्स कंपनीकडून कुटुंबियांना दिलासा देत त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे मान्य केले.
सचिनच्या मृत्यूमुळे लोहखनिज वाहतुकीबद्दल रोष निर्माण झाला होता. कुटुंबियांचा विनंतीनुसार बुधवारी अहेरीतील दुकानेही बंद ठेवण्यात आली होती. सचिनच्या कुटुंबाला ५ लक्ष रुपये तर एका गंभीर जखमीला १ लक्ष रुपये तथा रुग्णालयाचा खर्च, तसेच २ लोकांना कंपनीत नोकरी देण्याचे कंपनीने मान्य केल्याचे सांगितले जाते. मागण्या मान्य झाल्याने मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याला कुटुंबियांनी बुधवारी होकार देऊन संध्याकाळी सचिनचा अंत्यविधी पार पडला.
वाढत्या अपघातांसाठी जबाबदार कोण?
गेल्या काही दिवसात ट्रक आणि दुचाकी वाहनांमध्ये अपघातात वाढले आहेत. सुरजागड लोहखाणीमुळे रोजगार मिळून युवा वर्गाकडे मोठ्या प्रमाणावर दुचाकी वाहने वाढली आहेत. परंतू अनेक तरुणांकडे वाहन चालविण्याचा परवाना नाही. त्यामुळे वाहतुकीच्या नियमांचीही त्यांना माहिती नाही. अशा स्थितीत काही युवक बेभान होऊन, मद्यप्राशन करून वाहन चालवत स्वत:चा जीव धोक्यात घालतात. परिवहन आणि पोलिस विभागाने वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी सर्व वाहनांची नियमित तपासणी करून वाहतुकीच्या नियमांचे पालन होण्याची खबरदारी घेतल्यास अपघातांना बऱ्याच प्रमाणात आळा घालणे शक्य होणार आहे.