‘मेटास्टील इन्फ्रास्ट्रक्चर’ला अडपल्लीच्या लोकांचा विरोध

विशेष ग्रामसभा केली तहकूब

मुलचेरा : तालुक्यातील अडपल्ली ग्रामपंचायतच्या हद्दीत येऊ घातलेल्या मेटास्टील इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या प्रस्तावित पोलाद प्रकल्पाला गावकऱ्यांनी एकत्रित येऊ तीव्र विरोध दर्शवला आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात संमती दर्शवण्यासाठी सरपंचांनी गावकऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर घेतलेल्या विशेष ग्रामसभेवर गावकऱ्यांनी बहिष्कार टाकला. या विशेष ग्रामसभेत गावकऱ्यांनी कंपनीला जमीन देण्याच्या प्रयत्नाला विरोध दर्शवत ग्रामसभाच तहकूब करण्याचा निर्णय घेतला. या ग्रामसभेत सरपंच आणि कंपनीच्या प्रतिनिधींवर गावकऱ्यांनी धारेवर धरले.

अडपल्ली ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या काही गावातील नागरिकांची जमीन मेटास्टील इन्फ्रास्ट्रक्चर नावाच्या कंपनीने पोलाद प्रकल्पाच्या नावाखाली ग्रामपंचायतला मागितली. त्यासाठी सरपंचाने रविवारी (8 फेब्रुवारी) सायंकाळी गावात नोटीस चिकटवून तात्काळ दुसऱ्या दिवशी (दि.9) ग्रामसभा बोलावली. नोटीस चिटकवून तत्काळ ग्रामसभा घेण्याची काय गरज होती? असा सवाल करत गावकऱ्यांनी आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय कंपनीला जमीन द्यायची नाही, अशी भूमिका घेतली. गावकऱ्यांनी या ग्रामसभेवर बहिष्कार टाकला.

विशेष म्हणजे, यापूर्वी 4 फेब्रुवारीच्या सभेत गावकऱ्यांनी या विषयावर स्पष्ट विरोध दर्शवत जमीन विक्री न करण्याचा ठराव पारित केला होता. तरीही सरपंचांनी परस्पर नोटीस लावून नवीन ग्रामसभा बोलावल्याने गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप पसरला. कंपनीसाठी सक्रिय झालेल्या दलालांकडून आमिष दाखवत घराघरात वाद निर्माण केला जात आहे. अशा दलालांना धडा शिकवण्याचा निर्धार व्यक्त करत गावकऱ्यांनी सरपंच आणि कंपनी प्रतिनिधींचे मनसुबे हाणून पाडले. यादरम्यान वातावरण तापले असताना आष्टी पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.