वैरागड : आरमोरी तालुक्यातील कोजबी ग्रामपंचायतअंतर्गत येत असलेल्या सोनपूर येथील आबादी जागेवर बाहेरगावातील काही लोकांनी, तसेच जागेची गरज नसलेल्या गावातील काही लोकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. गावातल्या 14 एकर जागेवरील हे अतिक्रमण हटविण्याचा ठराव सोनपूरच्या ग्रामसभेने देऊनही त्यावर कार्यवाही करण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या कोजबी ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात गावकऱ्यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. हे अतिक्रमण तुम्ही हटविणार, की आम्हाला कायदा हाती घेऊन हे करावे लागेल, असा निर्वाणीचा इशारा या आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
अतिक्रमण हटविण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाला ग्रामसभेच्या वतीने लेखी पत्रव्यवहार केला. पण ग्रामपंचायत प्रशासनाने गावाच्या विरोधात भूमिका घेऊन रेकॉर्ड नसलेल्या व्यक्तींना नमुना आठ देण्याचा ठराव पारित केला होता. तो रद्द करून अवैधपणे केले जात असलेले घरांचे बांधकाम बंद करून जागा मोकळी करावी, बाहेरगावातील व्यक्तींनी रस्त्यालगत केलेले खताचे खड्डे हटवावे, पिण्याचे पाणी सुरळीत करून पाणी टंचाईवर उपाययोजना करावी, पेसा समितीचा निधी नियोजनानुसार तत्काळ खर्च करावा आदी मागण्या उपोषणकर्त्यांनी केल्या आहेत.
याविषयी 6 जून 2024 रोजी ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात सोनपूर येथील संपूर्ण गावकऱ्यांनी आंदोलन केले होते. त्या आंदोलनाची दखल घेत पंचायत समिती आरमोरीचे सहाय्यक गटविकास अधिकारी कुर्जेकर यांनी आंदोलनस्थळी येऊन चर्चा केली व ग्रामपंचायत प्रशासनाला तसे निर्देश दिले. त्यावरून कोजबीच्या सरपंच, सचिव यांनी सहाय्यक गटविकास अधिकारी यांच्या समक्ष आंदोलकांच्या सर्व मागण्या पूर्ण करणार असल्याचे सांगितले. तसेच ग्राम पंचायत प्रशासनाने सरपंच, सचिव यांच्या स्वाक्षरीनिशी हमीपत्र देऊन एक महिना सात दिवसाच्या आत सर्व प्रकरणे निकाली काढण्याचे तोंडी आश्वासन दिले, परंतु चार महिन्यांचा कालावधी उलटून सुद्धा एकही मागणी पूर्ण न झाल्याने 20 सप्टेंबर 2024 पासून सोनपूर येथील ग्रामसभेने ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत साखळी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाची दखल न घेतल्यास सर्व गावकरी आक्रमक होऊन कायदा हातात घेऊन अतिक्रमण काढतील, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
या आंदोलनात ग्रामसभा समितीचे अध्यक्ष सुरेश तुमरेटी, सदस्य दर्शना वाकडे, रामदास डोंगरवार, रसिका कुमरे, देवराव चुधरी, पुंडलिक सिडाम, रवींद्र डोंगरवार, गीता मडावी, ज्ञानेश्वर शेंडे, रामदास गावडे, विश्वनाथ तुमरेटी, गोपाल बावणे, अविनाश सिडाम, रमेश डोंगरवार, लोमेश वाकडे, श्रीरंग ठाकूर, रामदास रणदिवे, संदीप कुमरे, अशोक डोंगरवार, अरुण डोंगरवार, अरुण मडावी, दशरथ डोंगरवार आदी प्रामुख्याने सहभागी झाले आहेत.