नक्षलवाद्यांच्या कोंडीसह सर्वांगिन विकासासाठी पेनगुंडात पोलीस मदत केंद्र

पुन्हा एकदा 24 तासात उभारणीचा प्रयोग

गडचिरोली : नक्षलवाद्यांसाठी आतापर्यंत सुरक्षित ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम अशा पेनगुंडा गावाने आता कुस बदलायला सुरूवात केली आहे. वर्षभरापूर्वी ज्या गावातील एका नागरिकाची नक्षलवाद्यांनी हत्या केली होती त्याच गावाने पोलिसांच्या पुढाकाराने नक्षलवाद्यांना गावबंदी केली. त्यात आता या गावात पोलीस मदत केंद्राची उभारणी झाल्याने नक्षलवाद्यांच्या कोंडीसोबत गावाच्या सर्वांगिन विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

विशेष म्हणजे अतिसंवेदनशिल आणि अविकसित असलेल्या पेनगुंडा भागात पोलीस मदत केंद्राच्या उभारणीसाठी वनविभागाकडून जागा मिळताच 1000 सी–60 कमांडो, 25 बीडीडीएस टीम, नवनियुक्त पोलीस जवान, 500 विशेष पोलीस अधिकारी आणि खाजगी कंत्राटदार यांच्या मदतीने पुन्हा एकदा 24 तासात नवीन पोलीस मदत केंद्र उभारणीचा प्रयोग यशस्वी करण्यात आला. गर्देवाडानंतर या वर्षातील अतिदुर्गम भागातील पेनगुंडा हे दुसरे नवीन पोलीस मदत केंद्र आहे.

सीआरपीएफचे विशेष पोलीस महानिरीक्षक (पश्चिम क्षेत्र) टी.विक्रम, विशेष पोलीस महानिरिक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक (गडचिरोली परिक्षेत्र) अंकित गोयल, सीआरपीएफे उपमहानिरीक्षक अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, सीआरपीएफच्या 113 बटालियनचे कमांडण्ट जसवीर सिंग आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत उत्साहाच्या वातावरणात या नवीन पोलीस मदत केंद्राच्या उद्घाटनाचा सोहळा पार पडला.

यावेळी गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील म्हणाले, तुम्हाला नक्षलवाद्यांच्या दहशतीतून मुक्त करून पोलिसांनी नव्याने स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. हे पोलीस मदत केंद्र तुमच्या मदतीसाठीच आहे. त्याचा तुम्ही जास्तीत जास्त लाभ घ्या, असे आवाहन त्यांनी केले. या पोलीस मदत केंद्रामुळे आतापर्यंत दुर्लक्षित आणि विकासात्मक सोयीसुविधांपासून दूर असलेल्या या भागाच्या सर्वांगिन विकासाला चालना मिळेल आणि पोलीस त्यात महत्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास यावेळी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी व्यक्त केला.

यावेळी उपस्थित नागरिकांपैकी काही महिलांना नऊवारी साडी, स्वयंपाकाचे मोठे भांडे, पुरुषांना घमेले, ताडपत्री, स्प्रे-पंप, युवकांना लोअर पॅन्ट, टी-शर्ट, चप्पल, ब्लॅकेट, मुलींना सायकल, नोटबुक, पेन, स्कुल बॅग, फ्रॉक, चॉकलेट, बिस्कीट, मुलांना क्रिकेट बॅट, बॉल, व्हॉलीबॉल नेट, व्हॉलीबॉल इत्यादी विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी (भामरागड) अमर मोहिते व पोलीस मदत केंद्र पेनगुंडाचे नवनियुक्त प्रभारी अधिकारी सपोनि गणेश फुलकवर इत्यादी अधिकारी व पोलीस अंमलदार उपस्थित होते.

छत्तीसगड सीमेकडील शेवटचे पोलीस केंद्र

भामरागडपासून 15 किलोमीटर, धोडराजपासून 10 किलोमीटर, तर छत्तीसगड सीमेपासून फक्त 3 किमी अंतरावर असलेल्या अतिदुर्गम पेनगुंडा आणि आसपासच्या गावातील नागरिकांसाठी हे पोलीस मदत केंद्र मैलाचा दगड ठरणार आहे. त्यांची सुरक्षा आणि सर्वांगिन विकासाला हातभार लागून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणने या पोलीस मदत केंद्रामुळे शक्य होणार आहे. सदर केंद्राची उभारणी करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यात एकुण 1050 मनुष्यबळ, 10 जेसीबी, 10 ट्रेलर, 4 पोकलेन, 45 ट्रक इत्यादीच्या सहाय्याने अवघ्या एका दिवसांत पोलीस मदत केंद्राची उभारणी करण्यात आली. पोलीस बलाच्या सुविधेसाठी वायफाय, 20 पोर्टा कॅबिन, जनरेटर शेड, पिण्याच्या पाण्यासाठी आरओ प्लँट, मोबाईल टॉवर, टॉयलेट सुविधा, पोस्ट सुरक्षेसाठी मॅक वॉल, बी.पी. मोर्चा, 8 सँन्ड मोर्चा इत्यादींची उभारणी करण्यात येत आहे. यासोबतच पोलीस मदत केंद्राच्या सुरक्षेसाठी गडचिरोली पोलीस दलाचे 4 अधिकारी व 45 अंमलदार, एसआरपीएफ ग्रुप 14, छत्रपती संभाजी नगरचे 2 प्लाटुन तसेच सीआरपीएफ 113 बटालियन सी कंपनीचे 1 असिस्टंट कमांडन्ट व 70 अंमलदार, विशेष अभियान पथकाचे 6 पथक (150 कमांडोज) तैनात करण्यात आले आहेत.