Home पब्लिक प्रॉब्लेम ग्रामसभेने ताब्यात घेतलेला ट्रॅक्टर सोडण्यासाठी पोलिसांचा दबाव?

ग्रामसभेने ताब्यात घेतलेला ट्रॅक्टर सोडण्यासाठी पोलिसांचा दबाव?

दर्शनी ग्रामसभेची कारवाईची मागणी

गडचिरोली : सामूहिक वनहक्क पट्याच्या जागेत अतिक्रमण करताना दर्शनी चक येथील ग्रामसभेच्या पदाधिकाऱ्यांनी 27 जानेवारी रोजी अतिक्रमणधारकाला पकडून त्याने वापरलेला ट्रॅक्टर ताब्यात घेतला. त्यानंतर प्रशासनाने कारवाई करावी यासाठी पाठपुरावा केला. मात्र कोणतीही कारवाई न झाल्याने अतिक्रमणधारकाकडून जंगलाच्या नुकसान भरपाईपोटी एक लाख रुपये दंड वसूल करण्याचा ठराव ग्रामसभेने पारीत केला. यादरम्यान गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी सदर ट्रॅक्टर संबंधितांना परत देण्यासाठी तगादा लावल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी दर्शनी चक ग्रामसभेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. (अधिक बातमी खाली वाचा)

तक्रारीत नमुद केल्यानुसार, यासंबंधात जिल्हास्तरीय वनहक्क समितीचे सदस्य सचिव तथा अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक, गडचिरोली यांना दिले होते. त्यामुळे याप्रकरणाची चौकशी होवून प्रकरणातील ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त करण्याची कारवाई अपेक्षित होती. मात्र पोलिसांनी सूचनापत्र बजावून सदर प्रकरणातील ट्रॅक्टर परत देवून गैरअर्जदाराशी भांडण करु नये, अन्यथा तुमच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे तक्रारकर्त्यांना कळविले.

यामुळे दर्शनीचक ग्रामसभेने बैठक घेवून जंगलाचे नुकसान करणाऱ्यावर एक लाख रुपये दंडात्मक कारवाई करण्याचा ठराव पारित केला. गैरअर्जदाराने दंडाची रक्कम पुढील 15 दिवसांत ग्रामसभेकडे जमा न केल्यास प्रकरणातील ट्रॅक्टर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत लिलाव करून रक्कम वसूल करावे, असेही ठरवून तशी नोटीस बजावण्यात आली.

यानंतर अतिक्रमणधारक आरोपीने पोलीस निरीक्षकांशी यांच्याशी संपर्क करत ग्रामसभेच्या पदाधिकाऱ्यांवर ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी दबाव आणण्याचे काम सुरू केल्याचा आरोप ग्रामसभेने केला. यामुळे आमच्या ग्रामसभेला प्राप्त सामूहिक वनहक्क आणि कायदेशीर अधिकारांवर गदा आल्याची स्थिती निर्माण झाली असून अतिक्रमणधारक चरणदास कवडूजी पिपरे व गडचिरोली पोलीस स्टेशनच्या निरीक्षकांवर जिल्हा प्रशासनाने कारवाई करावी आणि ग्रामसभेचे हक्क अबाधित राखावे, अशी मागणी दर्शनी चक ग्रामसभेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

ग्रामसभेला ट्रॅक्टर ताब्यात ठेवण्याचा अधिकार नाही

यासंदर्भात पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले, दर्शनी माल येथील चरणदास पिपरे यांनी भाड्याने लावलेला ट्रॅक्टर 10 लोकांनी बळजबरीने त्यांच्या ताब्यात ठेवला, शिवीगाळ केली आणि वारंवार मागणी करून सुद्धा ते परत देत नाहीत, अशी तक्रार प्राप्त झाली होती. त्या 10 लोकांचे कृत्य हे फौजदारी पात्र गुन्हा असताना केवळ शेतकरी आहेत, कायद्याचे अज्ञान आहे म्हणून आम्ही ट्रॅक्टर मालकास ट्रॅक्टर परत करा, असे सूचविण्यात आले. ग्रामसभेला एखाद्याच्या मालकीचा ट्रॅक्टर फौजदारी पात्र धाकदपट करून जवळपास दोन महिने ताब्यात ठेवण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. एका शेतकऱ्याचा ट्रॅक्टर बळजबरीने ताब्यात ठेवणे आणि त्याने वारंवार मागणी करूनही न देणे हा फौजदारी गुन्हा ठरतो. पण गावातील प्रकरण सामोपचाराने मिटले जावे म्हणून कोणावर कारवाई न करता समजविण्याचा प्रयत्न केला, असे पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी स्पष्ट केले.