देसाईगंज : पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील महिलेचा प्रसुतीदरम्यान झालेला मृत्यू राज्यात गाजत असताना गडचिरोली जिल्ह्यातही एका कंत्राटी डॅाक्टरच्या हेकेखोरपणामुळे गरोदर महिलेसह तिच्या पोटातील बाळाला जीव गमवावा लागला. या घटनेची गंभीर दखल घेऊन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी संबंधित कंत्राटी डॅाक्टरसह आरोग्य सेविकेला सेवा समाप्तीचा आदेश दिला.
मनिषा शत्रुघ्न धुर्वे असे मरण पावलेल्या गर्भवती महिलेचे नाव आहे. तिची पहिलीच प्रसुती असल्यामुळे ती आपल्या माहेरी विसोरा येथे होती. याचदरम्यान दि.13 ला रात्री तिला प्रसुतीवेदना जाणवू लागल्याने तिला विसोरा येथील आरोग्य उपकेंद्रात आणण्यात आले. दि.14 ला सकाळपासून तिच्या वेदना वाढल्या. मात्र तेथील कंत्राटी आरोग्य सेविका उषा निर्भय उके आणि कंत्राटी डॅाक्टर गणेश मुंडले यांनी मनीषा धुर्वेकडे लक्ष दिले नाही. अखेर नातेवाईकांनी रुग्णवाहिका आणून तिला बाहेर उपचारासाठी नेण्याचे ठरविले. पण डॅाक्टर आणि आरोग्य सेविकेने दुसरीकडे उपचारासाठी नेऊ दिले नाही. अखेर दुपारी प्रकृती आणखी गंभीर झाल्यानंतर डॅाक्टरने दुसरीकडे नेण्याचा सल्ला दिला. मात्र तोपर्यंत उशिर झाला होता आणि मनीषा हिचा देसाईगंज येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
वास्तविक प्रसुतीवेदना असह्य होत असतानाही त्याकडे डॅाक्टर आणि आरोग्य सेविकेने लक्ष दिले नाही. उलट तिला दुसरीकडील उपचार घेण्यापासून रोखले. त्यामुळे तिच्या मृत्यूला डॅाक्टर आणि आरोग्य सेविकाच जबाबदार असल्याने त्यांच्यावर आरोग्य विभागासोबत पोलीस विभागानेही कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शिवसेना(उबाठा)चे जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, उपजिल्हा प्रमुख अविनाश गेडाम यांनी केली आहे.